Parliamentary (File Image)

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) या संस्थेच्या अहवालात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एडीआरच्या अहवालानुसार, 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजेच 44 टक्के खासदारांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. इतकेच नाही तर, एडीआरच्या अहवालात असेही समोर आले आहे की, खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की, त्यापैकी 5 टक्के अब्जाधीश आहेत, ज्यांची संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे.

एडीआर अहवालानुसार, 29 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, खुनाचा प्रयत्न, जातीय तेढ वाढवणे, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या अहवालात म्हटले आहे की, निवर्तमान खासदारांपैकी नऊ जणांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार यापैकी 5 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत.

अहवालानुसार, 28 खासदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे की, त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 21  खासदार भाजपचे आहेत. अहवालात म्हटले आहे की, 16 खासदारांवर महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित आरोप आहेत, त्यापैकी तीन जणांवर बलात्काराच्या आरोपांचा समावेश आहे. अहवालानुसार, राज्यवार गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमधील 50 टक्क्यांहून अधिक खासदारांवर फौजदारी आरोप आहेत. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला लिहिले पत्र, जाणून घ्या कारण)

एडीआरच्या अहवालात या खासदारांच्या आर्थिक स्थितीचेही विश्लेषण करण्यात आले आहे. अहवालानुसार, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेसचे सर्वाधिक खासदार अब्जाधीश आहेत. एडीआरच्या अहवालानुसार, नकुल नाथ (काँग्रेस), डीके सुरेश (काँग्रेस) आणि के. रघुराम कृष्ण राजू (अपक्ष) यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. या अहवालात खासदारांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि वय यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अहवालानुसार, 73 टक्के खासदार पदवीधर आहेत किंवा त्यांच्याकडे उच्च शैक्षणिक पात्रता आहे.