Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला लिहिले पत्र, जाणून घ्या कारण
Sharad Pawar | Twitter /ANI

Sharad Pawar’s NCP Files Complaint: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दोन्ही पक्षांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या सेना आणि भाजपने त्यांच्या 'स्टार प्रचारक यादी'चा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील अनेक व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 चे थेट उल्लंघन आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेच्या घोर उल्लंघनाबाबत आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.’

‘शिवसेनेने (एकनाथ शिंदे) माननीय पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इत्यादी उच्च सार्वजनिक पदावर असलेल्या विविध लोकांची नावे प्रसिद्ध केली आहेत. हे केवळ लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन नाही, तर आदर्श आचारसंहितेचेही उल्लंघन आहे. नियमानुसार केंद्रात किंवा राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांच्या अधिकृत पदांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यापासून स्पष्टपणे प्रतिबंधित केले आहे.’ (हेही वाचा: Mahadev Jankar Parbhani: महादेव जानकर यांना परभणी येथून उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून रिंगणात)

‘आम्हाला आशा आहे की भारताचा निवडणूक आयोग आपल्या देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करेल.’ दरम्यान, लोकसभा निवडणुकीला काही दिवस उरले आहेत, मात्र महायुतीमध्ये जागावाटपाबद्दल अजूनही चर्चा सुरु आहे. मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपावरून बैठक झाली. महायुतीच्या काही जागांवर अजूनही साशंकता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर जागांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.