Mahadev Jankar Parbhani: महादेव जानकर यांना परभणी येथून उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून रिंगणात
Mahadev Jankar | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sanjay Jadhav Vs Mahadev Jankar: परभणी लोकसभा मतदारसंघातून (Parbhani Lok Sabha Constituency राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुती द्वारे उमेदवारी जाहीर झाली आहे. जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी आजच्या (30 मार्च) पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024) परभणी येथील सामना शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav Parbhani) विरुद्ध महादेव जानकर असा रंगणार आहे. संजय जाधव हे महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत.

महायुतीच्या जागावाटपामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. तसेच, महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अतिशय योग्य आणि शांततेत सुरु आहे. कोणत्याही पक्षाचे, नेत्यांचे मतभेद नाहीत. ज्या काही जागांवर वाटाघाटी करणे आवश्यक आहे ते होत आहे. अर्थात काही नेते जरुर नाराज आहेत. पण त्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीमधील सर्वच घटक पक्षांना यश येते आहे, असे तटकरे म्हणाले.  (हेही वाचा, Mahadev Jankar: महादेव जानकरांची महायुतीला साथ, रासपला राज्यात एक जागा मिळणार)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास उमेदवार जाहीर करण्यास विलंब का लागतो आहे? खास करुन बारामती लोकसभा मतदारसंघातून? असे विचारले असता थोडा संयम बाळगा. घड्याळातील काट्यानुसार अचूक वेळ तुम्हाला कळे आणि बारामतीचा उमेदवारही जाहीर केला जाईल, असे तटकरे म्हणाले. (हेही वाचा, Mahadev Jankar on Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी वाताहत अधिक, महादेव जानकर असं का म्हणाले?)

महायुतीपासून आपण केव्हाही दूर गेलो नव्हतो. परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद आहे. आमचे या मतदारसंघातून आमदारही निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघासाठी मी आग्रही होतो. माझा आग्रह महायुतीतील घटक पक्षांनी मान्य केल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. (हेही वाचा, Mahadev Jankar: मी पंतप्रधान होणारच, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली : महादेव जानकर)

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल विचारले असता, जानकर म्हणाले, राजकारणात गाठीभेटी होत असतात. परस्परविरोधी विचारांच्या राजकीय नेत्यांना, विरोधकांना भेटण्याची विचारविनीमय करण्याची आपली संस्कृती आहे. याचा अर्थ मी महायुती सोडून गेलो असा नाही. मी महायुतीमध्येच होतो. माझ्या रासप पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मत महायुतीलाच दिले होते, अशी आठवणही जानकर यांनी या वेळी आवर्जून सांगितली.  जानकर यांचा महायुतीला किती फायदा होतो, याबाबत आगामी काळातच समजू शकणार आहे.