काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मिळणारी एसपीजी सुरक्षा (Special Protection Group)हटण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा काढून घेतली होती. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते नरेंद्र मोदी आणि गांधी कुटुंबीयांना सुरक्षा प्रदाण करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच हा प्रश्न राहिला आहे की, काय असते ही एसपीजी सुरक्षा. ती कोणाला दिली जाते. जाणून घेऊया SPG Security म्हणजे नेमकं काय?
एसपीजी कधी अस्तित्वात आली?
विशेष सुरक्षा दल म्हणजेच Special Protection Group ही केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अधिपत्याखाली येणारी यंत्रणा आहे. 1981 पूर्वी एसपीजी ही दिल्ली पोलिसांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर या यंत्रणेला व्यापक स्वरुप देऊन ती केंद्रीय सचिवालयाच्या अधिपत्याखाली आणण्यात आली.
एसपीजी काय काम करते?
भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (ज्यांच्या जीविताला धोका आहे) तसेच, त्यांचे कुटुंबीय यांच्या संरक्षणाची प्रमुख जबाबदारी एसपीजीकडे असते. या व्यक्तींच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी या यंत्रणेकडे असते. यात या महत्वपूर्ण व्यक्तींचे राजकीय, सामाजिक कार्यक्रम तसेच त्यांच्या खासगी कार्यक्रमातही ही यंत्रणा कार्यरत असते. देशातील सर्वात अत्याधुनीक आणि सक्षण अशी यंत्रणा म्हणून या यंत्रणेकडे पाहिले जाते. (हेही वाचा, राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय व केव्हा लागू होते? वाचा सविस्तर)
देशातील ज्या व्यक्तिमत्वांना एसपीजी यंत्रणा पुरवली जाते त्या व्यक्तीमत्वांसोबत एसपीजी जवान 24 तास सुरक्षा देतात. त्यांचे अंगरक्षक, त्यांचे निवासस्थान, विमान आणि वाहन आदींची सुरक्षा करण्याचे काम एसपीजी यंत्रणेकडे असते. एसपीजी सुरक्षा प्राप्त व्यक्ती एका सुरक्षा कवचाखालीच जगत असते. त्यांचा प्रवास, व्यक्तिगत जीवन आदींवरही एसपीजी सुरक्षेची छाया असते. एसपीजी ही देशातील अधिक शक्तिशाली यंत्रणा असते. एसपीजी सुरक्षेत केणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होत नाही. खपवून घेतला जात नाही.