Multiple Bank Accounts: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असल्यास वेळीच व्हा सावध; होऊ शकते मोठे नुकसान, घ्या जाणून सविस्तर
Bank (Photo Credit: PTI)

जर का तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. तर आजकाल अनेकांची वेगवेगळ्या बँकेत खाती असतात. परंतु एकाधिक बँक खात्यांसह तुमचे आर्थिक नुकसान तसेच इतर अनेक नुकसान होऊ शकते. महत्वाचे म्हणजे यामध्ये नक्की कसला आर्थिक तोटा झाला आहे हे तुमच्या लक्षातही येत नाही. कर आणि गुंतवणूक तज्ञ देखील एकच बँक खाते ठेवण्याची शिफारस करतात. या लेखात जाणून घ्या एकापेक्षा जास्त खाती असण्याचे तोट.

अनेक बँकांमध्ये खाते सुरू ठेवल्यास पहिला तोटा होतो तो मेंटेनन्सचा. प्रत्येक बँकेचा स्वतःचा स्वतंत्र मेंटेनन्स चार्ज, डेबिट कार्ड चार्ज, एसएमएस चार्ज, सर्व्हिस चार्ज, किमान शिल्लक शुल्क असते. म्हणजेच, तुमची जितक्या जास्त बँकांमध्ये खाती, तितके जास्त आणि वेगवेगळे चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. तसेच खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास बँका भारी शुल्क आकारतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक खात्याचा हा नियम पाळावा लागेल.

कर तज्ज्ञांच्या मते, तुमचे एकच बँक खाते असल्यास रिटर्न भरणे सोपे आहे. कारण तुमच्या कमाईची संपूर्ण माहिती एकाच खात्यात उपलब्ध असते. वेगवेगळी बँक खाती असल्याने ही गणती अवघड, किचकट आणि मोठी होते. अशा परिस्थितीत कर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतो. अशा समस्या सोडवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारन यांनी या अर्थसंकल्पात नवीन प्रणालीची घोषणा केली होती.

या नवीन नियमांतर्गत पगाराच्या उत्पन्नाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती, जसे की लाभांश उत्पन्न, भांडवली नफ्याचे उत्पन्न, बँक ठेवीवरील व्याजाचे उत्पन्न, पोस्ट ऑफिसवरील व्याज उत्पन्नाची माहिती आधीच भरली जाईल. ही माहिती पॅनकार्डच्या मदतीने मिळणार आहे.

सेव्हिंग खात्यात किंवा करंट खात्यात वर्षभर कोणताही व्यवहार न केल्यास ते Inactive Bank Account बनते. दोन वर्षांपर्यंत त्या खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास, ते Dormant Account किंवा Inoperative खात्यात रूपांतरित होते. अशा बँक खात्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते. बँकर्सचे म्हणणे आहे की या खात्यांमुळे अंतर्गत आणि बाह्य फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे तुमची जितकी खाती असतील ती सर्व चालू ठेवावी लागतील. (हेही वाचा: वाहतूकीचे नियम मोडणे पडेल आता महागात, अवघ्या काही मिनिटांतच येईल लाखो रुपयांची पावती हातात)

खाजगी बँकांच्या खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी काही रक्कम ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, HDFC बँकेची किमान शिल्लक 10 हजार रुपये आहे. ग्रामीण भागासाठी 5000 रुपये आहे. ही शिल्लक न ठेवल्यास एक चतुर्थांश दंड म्हणजेच 750 रुपये दंड आहे. इतर खाजगी बँकांसाठीही असेच शुल्क लागू आहे. जर तुम्ही चुकून किमान शिल्लक राखली नाही, तर तुम्हाला दरमहा शेकडो रुपये विनाकारण दंड म्हणून भरावे लागू शकतील. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम होतो.

तर म्हणून तुम्ही तुमची अनावश्यक खाती बंद करा, जेणेकरून तुम्हाला अशा त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. खाते बंद करण्यासाठी, तुम्हाला डी-लिंक फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला बँकेच्या शाखेतून खाते बंद करण्याचा फॉर्म मिळतो, तो भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर तुमचे खाते बंद होते.