Income Tax: ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या इन्कम टॅक्स स्लॅबची सुविधा; जाणून घ्या कसा घ्याल लाभ
Representational Image (Photo Credits: Pixabay)

ITR Filing 2019: आयकर (Income Tax) च्या नियमात प्रत्येक वर्षी अर्थ मंत्रालयाकडून काही ना काही बदल करण्यात येतात. तसंच नागरिकांना आयकर भरण्याचे आवाहन देखील करण्यात येते. पण तुम्हाला ठाऊक आहे का? ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे नियम सामान्य नागरिकांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे आयकर भरण्यापूर्वी  हे नियम माहिती करुन घेणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आयकरचा कायदा काय आहे किंवा त्यांच्यासाठी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊया... (आता इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधारकार्ड ही धरले जाणार ग्राह्य)

ज्येष्ठ नागरिक

# 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणारी आणि 80 वर्षाहून कमी वय असणारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक ठरते. तसंच ती भारतीय नागरिक असणे देखील महत्त्वाचे आहे.

# एका ज्येष्ठ नागरिकाला जो एनआरआय आहे त्याच्या तुलनेत भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीला आयकरात अधिक सूट मिळते. भारतात रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकास मिळणारी सूट मर्यादा 3,00,000 रुपये आहे. तर अनिवासींसाठी सूट मर्यादा 2,50,000 रुपये आहे. म्हणूनच, सामान्य करदात्याच्या तुलनेत निवासी ज्येष्ठ नागरिकास 50,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळतो.

80 आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक

# 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणारी व्यक्ती अति ज्येष्ठ नागरिक ठरते. त्याचबरोबर ती भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे. तसंच आयकरमध्ये मिळणाऱ्या सवलतींचा लाभ मिळण्यासाठी Form ITR 1/4 भरणे आवश्यक आहे. (नोकरदार लोकांसाठी या आहेत '6' Tax Saving Investments,इन्कम टॅक्स वाचवायला होईल मदत)

# अति ज्येष्ठ नागरिकांना तुलनेत अधिक लाभ मिळतो. आर्थिक वर्ष 2015-16 साठी अति ज्येष्ठ नागरिकांना 5,00,000 रुपयांपर्यंत सूट मिळत होती. म्हणजेच एका अति ज्येष्ठ नागरिकाला 5,00,000 रुपयांच्या उत्पन्नापर्यंत कोणताही कर भरावा लागत नव्हता.

# तर भारताचा रहिवासी नसलेल्या अति ज्येष्ठ नागरिकाला 2,50,000 रुपयांपर्यंत सूट मिळत होती. याचाच अर्थ भारताचे रहिवासी असलेल्या अति ज्येष्ठ नागरिकांना 2,50,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.

तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) ऑनलाईन भरु शकता किंवा आयकर विभागाच्या ऑफिसमध्ये जावून भरण्याचीही सोय आहे. तसंच आयकर भरण्यासाठी वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल.