7 Tips for Financial Freedom: जगातील प्रत्येक व्यक्तीस आर्थिक सपन्नता आणि आर्थिक स्वातंत्र्य हवे असते. याला काही अपवाद असतात. पण, शक्यतो सर्वच लोक कर्जमुक्त जीवन (Debt-Free Life) जगण्याचा प्रयत्न करत असतात. असे असले तरी आर्थिक उत्पन्न आणि आपेक्षा, मोठी स्वप्ने यांचा मेळ घालायचा तर कर्ज घ्यावेच लागते. कर्ज केवळ स्वप्नपूर्तीसाठीच घेतले जात नाही. तर, कधीकधी अचानक उद्भवलेल्या तत्कालीन परिस्थितीमुळेही घेतले जाते. अशा वेळी कर्जमुक्ती मिळविण्यासाठी वेगवान मार्ग कोणता? यावर अनेकदा विचारविनीमय केला जातो. या प्रश्नाच्या उत्तरार्थ आम्ही काही शोध घेतला असता कर्जमुक्तीच्या मार्गातील सात महत्त्वाचे मुद्दे प्रामुख्याने पुढे आले. हे मुद्दे आपण येथे पाहू शकता आणि प्रत्यक्ष जीवनातही आपापल्या जबाबदारीवर आणि आर्थिक सल्लागाराच्या मदतीने अंमलात आणू शकता.
1. तपशीलवार बजेट तयार करा:
उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची रूपरेषा तयार करा. त्यानुसार खर्चाचे वर्गीकरण करा. त्यापैकी कोणता खर्च आपण कमी करु शकता याचीही एक वेगळी यादी करा. त्यावर तातडीने अंमलबजावणी करा. शिवाय अनावश्यक खर्च टाळा. बचत वाढवा.
2. उच्च-व्याज कर्जांना प्राधान्य द्या:
आपण घेतलेल्या कर्जांमधली सर्वच कर्जे महाग किंवा तातडीची नसतात. पण काही कर्जे चढ्या व्याजदराने घेतलेली असतात. ज्यामुळे केवळ व्याजापोठी उत्पन्नातील मोठी रक्कम खर्च होते. अशा वेळी महागडे व्याजदर अलेली कर्चे कमी करण्यावर विशेष भर द्या. त्या दृष्टीने प्रयत्न करा. कर्जाची व्याजदराच्या उतरत्या क्रमाने वर्गवारी करा. त्यानुसार ते कर्ज फेडण्यास प्राधान्य द्या.
3. निगोशिएट व्याज दर:
बँकेशी संपर्क साधून व्याजदर कमी करण्यासंदर्भात वाटाघाटी करा. केंद्र सरकार, आरबीआय किंवा तत्सम अधिकृत यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या सूचना, आदेश, माहिती यांवर बारीक लक्ष ठेवा. अनेकदा कर्जाचे व्याजदर घटलेले असतात मात्र बँका त्याचा थेट फायदा कर्जदारास देण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी प्रत्यक्ष बँकेशी संपर्क साधून वाटाघाटी करा. बँकेकडून कधी कधी कर किंवा व्याजदरात सूट दिली जाते. त्याचाही फायदा घ्या.
4. कर्ज एकत्रीकरण पर्याय:
वेगवेगळ्या कर्जावर वेगवेगळे व्याजदर लागू असतात. तसेच, त्यांच्या हफ्त्यांच्या तारखाही वेगवेगळ्या असतात. अशा वेळी वेगवेगळी कर्जे जर तुम्हाला एकाच छताखाली आणता आली तर त्याला प्राधान्य द्या. कर्जाचे एकत्रिकरण झाल्यास लागणारे व्याजदर, वेगवेगळे करशुल्क आणि सातत्याने येणारा हप्त्यांचा ताण, अपवादात्मक स्थितीमध्ये संस्था, व्यक्तींसोबत खराब होणारे नातेसंबंध ळले जातात.
5. उत्पन्नाचे प्रवाह वाढवा:
कोणतेही कर्ज हा एक प्रकारचा राक्षसच असतो. जो व्याजरुपात आपले शोषण करत असतो. त्यामुळे हे शोषण थांबवायचे तर उत्पन्नाचा स्त्रोत वाढला पाहिजे. त्यासाठी आपल्या नियमीत मिळकतीसोबतच इतर मार्गातून आर्थिक स्त्रोत निर्माण करता आला तर पाहा. अतिरिक्त उत्पन्नाचा प्रवाह वाढविण्यासाठी पार्टटाईन नोकरी, फ्रीलान्सींग, कामाच्या ठिकाणी अधिक वेळ काम (ओव्हरटाईम) आदी गोष्टींना प्राधान्य द्या. अतिरिक्त उत्पनातून थेट कर्जफेडीला प्राधान्य द्या.
6. आपत्कालीन निधीची स्थापना:
आगोदरच कर्जात असताना अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिताला सामोरे जाण्यास सज्ज राहा. त्यासाठी आपत्कालीन निधी सोबत बाळगा. काहीही झाले तरी त्या पैशांना अपवादात्मक अथवा आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याखेरीच धक्का लावू नका. उलट त्यात वाढ करत चला. हा पैसा आप्तकालीन निधी म्हणूनच तयार ठेवा.
7. व्यावसायिक मार्गदर्शन घ्या:
डोक्यावर कर्ज आहे म्हणून गांगरुन जाऊ नका. शांततेने विचार करा. त्यासाठी आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्या. त्यासाठी दोन पैसे खर्च करावे लागे तर ते करा. पण व्यावसायिक सल्लागार, क्रेडीट समुपदेशकांकडून सल्ला घ्या. ज्यामुळे तुम्हाला महागडी आणि दीर्घकालीन कर्जे कमी वेळात फेडण्यास मदत होईल.
वरीलपैकी सात मुद्द्यांवर विचार केल्यास आणि धोरणात्मक पावले टाकल्यास निश्चितपणे आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळवू शकता. तसेच, कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी अधिक वेगाने वाटचाल करु शकता. अर्थात, वर दिलेले मुद्दे हे केवळ मार्गदर्शक आणि सल्लावजा देण्यात आले आहेत. वरील माहिती वाचून कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या.