Tejas Aircarft (Photo Credit - Twitter/@ianuragthakur)

DAC Approved Defence Equipment: भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रू देशांची आता खैर नाही. कारण, आता भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) ताकद आणखी वाढवण्यासाठी भारत सरकारने तेजस विमाने (Tejas Aircarft) आणि प्रचंड हेलिकॉप्टर (Prachand Helicopters) खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) 97 अतिरिक्त तेजस लढाऊ विमाने आणि सुमारे 150 प्रचंड लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत होणार आहे.

मेगा खरेदी प्रकल्पासाठी 1.3 लाख कोटी रुपयांचा खर्च -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण संपादन परिषदेने (DAC) भारतीय हवाई दलाच्या Su-30 लढाऊ ताफ्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे. प्राप्त माहितीनुसार, या मेगा खरेदी प्रकल्प आणि Su-30 अपग्रेड कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीवर 1.3 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. DAC ने मंजूर केलेल्या प्रकल्पांचा तपशील संरक्षण मंत्रालय लवकरच देईल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा - PM Modi Takes Flight In Tejas Fighter: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलं तेजस फायटरमधून उड्डाण)

देशातील सर्वात मोठी लढाऊ विमानांची डील -

दरम्यान, भारतीय हवाई दलाने आधीच 83 LCA Mark1A लढाऊ विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यांची डिलिव्हरी फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. 97 विमानांची किंमत सुमारे 65,000 कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे जी देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी लढाऊ विमानांची डील असेल. (हेही वाचा - Defence Expo 2022: आशियातील सर्वात मोठा डिफेन्स एक्स्पो भारतात पार पडणार; जाणून कालवधी, ठिकाण आणि संबंधित सविस्तर माहिती)

तथापी, ANI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानाचे संपूर्ण डिझाइन आणि विकासाचे काम करणार आहे. ज्यामध्ये विमानाला नवीनतम विरुपाक्ष AESA रडारने सुसज्ज करणे समाविष्ट आहे. Su-30 लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार आहेत. त्यापैकी 260 आधीच सेवेत आहेत. जेट विमाने वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. आता सुमारे 50 टक्के लढाऊ विमाने तयार झाली आहेत.