सध्या देशातील तरुण पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा, भाषेचा फार मोठा पगडा असलेला दिसत आहे. पालकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या (English Medium) शाळेत घालण्यास उत्सुक असतात. मात्र देशातील 42 टक्क्यांहून अधिक मुले हिंदी माध्यमाच्या (Hindi Medium) शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यानंतर इंग्रजी माध्यमामध्ये 26 टक्के मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इनफॉरमेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) च्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार प्रादेशिक भाषांमध्ये बंगाली (Bangali) व मराठी (Marathi) आघाडीवर आहेत. देशातील 6 टक्के विद्यार्थी बंगाली माध्यमामध्ये शिक्षण घेत आहेत, तर मराठी माध्यमामध्ये 5 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानंतर 2 टक्के विद्यार्थ्यांसह तमिळ भाषेचा नंबर लागतो. 2019-20 च्या अहवालात भारतातील 15 लाखाहून अधिक शाळांमधील प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या सुमारे 26.5 मालाचा डेटा दर्शवण्यात आला आहे.
यूडीआयएसई+ च्या अहवालानुसार, केवळ 69 आणि 61 विद्यार्थी अनुक्रमे बिष्णुप्रिया मणिपुरी आणि डोगरी-माध्यम शाळांमध्ये शिकतात. महत्वाचे म्हणजे काश्मिरी माध्यमात एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाही. एकूण 1,187 विद्यार्थी फ्रेंचमध्ये शिक्षण घेत आहेत तर, सिंधी माध्यमामध्ये 669 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
अहवालात म्हटले आहे की सन 2019-20 मध्ये पूर्व-प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंत एकूण 26.45 कोटी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेतले, जे 2018-19 च्या तुलनेत 42.3 लाख जास्त आहे. 2018-19 च्या तुलनेत 2019-20 मध्ये शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर मुलींच्या नोंदणीत वाढ झाली आहे. पूर्व-प्राथमिक स्तरावर ही वाढ सर्वाधिक होती. (हेही वाचा: Maharashtra SSC Result 2021 Date: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल, जुलै महिन्यात 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता)
शालेय शिक्षणामधील शिक्षकांची संख्या 2018-19 च्या तुलनेत 2019-20 मध्ये 2.72 टक्क्यांनी वाढली आहे. 2019-20 मध्ये 96.87 लाख शिक्षक शालेय शिक्षणात गुंतले होते, जे 2018-19 च्या तुलनेत 2.57 लाख जास्त आहे.