तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या घरात कोविड मुळे 8 दिवसांत 3 जण दगावले; कांताबाई सातारकर सह त्यांची लेक, नातवाचा देखील मृत्यू

कोविड 19 संकटाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेकांचि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये कलाकार मंडळी देखील अपवाद नाहीत. प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांच्या घरातही अशीच दुर्दैवी अवस्था आहे. 8 दिवसांत या कुटुंबाने 3 मृत्यू झेलले आहेत. 25 मे ला रघुवीर खेडकर यांच्या आई कांताबाई सातारकर (Kantabai Satarkar)  मृत्यूमुखी पडल्या. त्यापूर्वी काही दिवस कांताबाईंची मोठी मुलगी अनिता ऊर्फ बेबीताई यांना कोरोनाने हिरावले आणि आता कांताबाईंचा नातू अभिजीत ऊर्फ बबलू खेडकर याचादेखील कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे. सध्या या कुटुंबातील इतर व्यक्ती देखील कोविड 19 चे उपचार घेत आहेत.

कांताबाईंची लेक अनिता ऊर्फ बेबीताई यांच्यावर संगमनेरमध्ये कोविड 19 चे उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नंतर कांताबाईंचा नातू अभिजीत ऊर्फ बबलू यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. पण त्यानेही उपचारादरम्यान जीव सोडला.

दरम्यान कांताबाई यांचं नावं तमाशा कलावंतासाठी आदराचं स्थान आहे. मोठ्या संघर्षाने त्यांनी ही कला जपली. काही वर्षांपूर्वीच तमाशा कलाक्षेत्रात 70 वर्ष योगदान दिल्यानं कांताबाईंचा गौरव जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला होता. तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 2005 साली पहिला ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित केले. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता.