Swarajyarakshak Sambhaji Episode 22 जानेवारी, 2019: स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेतील कारभारी लोकांचा निवाडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. इतके मोठे कटकारस्थान केलेल्या लोकांना काय शिक्षा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अनाजी पंतांनी सोयरा बाईसाहेबांचे नाव घेतल्याने, सोयराबाई जिंजीस जाण्यास निघाल्या होत्या. त्यानंतर अटकेत असूनही अनाजी पंतांनी सोयराबाईंना चिठ्ठी पाठवल्याने शंभू राजेंनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. कालच्या भागात (22 जानेवारी) कारभारी सदरेवर येताच शंभू राजे त्यांच्यावर बरसतात. शंभू राजांच्या हे ध्यानात आले आहे की, कारभाऱ्यांच्या शब्दाला सोयराबाई भुलल्या. जे काही घडले त्यामागे त्यांची बुद्धी नसून कारभारी लोकांनी त्यांना तसे करायला भाग पाडले. सर्वात महत्वाचे म्हणजे यामागे एकच आसामी आहे ती म्हणजे अनाजी पंत ही गोष्ठही त्यांच्या ध्यानात आली आहे. अनाजी पंतांनीच सर्व मोठ्या खुबीने जमून आणले होते. मात्र आबासाहेबांच्या पुण्याईने असे काही घडले नाही.
शंभूराजे म्हणतात, ‘दारात शत्रू उभा आहे, औरंगजेब, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज असे सर्व स्वराज्य काबीज करायला टपून बसले आहेत, त्यामुळे आता कोणतीही गोष्ट सोपी नाही, अशा प्रकारे कारस्थान करणेही सोपे नाही. आता आबासाहेबांनी कमावलेले स्वराज्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे, मात्र तुम्ही ते ठेवले नाही.’ यावर कारभारी अजूनच घाबरतात, संभाजी राजे मोठी शिक्षा करणार याची त्यांना खात्रीच पटते.
मात्र या पुण्य स्वराज्यात सूड उगवायचा नाही, स्वार्थ्याने वागायचे नाही म्हणून शंभूराजे कारभारी लोकांना चक्क माफ करतात. कारभाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून, तसेच ते वडिलधारे असल्याने शंभूराजे शिक्षा देण्याचे टाळतात. आजपर्यंत त्यांनी आबासाहेबांना दिलेली साथ संभाजी राजे जाणत असतात.
हे ऐकल्यावर अनाजी आणि सोमाजीसोडून गहिवरलेले इतर कारभारी समोर येतात, डोळ्यात अश्रू घेऊन ते संभाजी राजांची तारीफ करतात. शिवाजी राजे आजही आपल्यातच आहेत अशी त्यांची भावना झालेली असते. शेवटी ते संभाजी महाराजांचा जयजयकार करतात. शिक्षा जरी झाली नसली तरी, कारभाऱ्यांना मुक्त करून शंभूराजे त्यांच्या घरावर चौक्या पहारे बसवतात, त्यांना नजरकैदेत ठेवतात. मात्र हे ऐकून अनाजी पंतांच्या चेहऱ्याचा रंग बदलतो.
शंभूराजे सदरेवरून बाहेर पडल्यावर, राणूबाई समोर येऊन कारभाऱ्यांना का माफ केले याचा जाब विचारतात. मात्र आता निवाडा संपला आहे असे सांगून शंभूराजे तिथून निघून जातात. अनाजी पंत आणि सोमाजी घरी परत येतात, अनाजी पंतांची पत्नी त्यांचे औक्षण करून त्यांना घरामध्ये घेतात. अनाजी आणि सोमाजी यांच्या वागण्याबद्दल त्या चार खडे बोल सुनावतात. शंभूराजांच्या रूपाने शिवाजी महाराजांनीच न्याय केला, त्यांनी माणुसकी दाखवली, वडील असण्याचा मान ठेवला. मात्र अनाजी आणि सोमाजी यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. अजूनही संभाजी राजांबद्दल त्यांच्या मनात राग असतो. पश्चातापाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
निवाडा झाल्यावर शंभूराजे पुतळाबाईसाहेबांना भेटायला येतात. तिथे राणूबाई आणि येसूबाईदेखील असतात. राणूबाईंचा राग अजून गेलेला नाही, त्या चिडतात, तुम्ही तो अपमान, केलेले कटकारस्थान कसे विसरू शकता ते विचारतात. त्यावर, कारभारी लोकांची गडावर जी अहवेलना झाली, जो अपमान झाला ती काही कमी नाही. आज दिलेल्या माफीमुळे कारभारी आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत राहतील, त्यांची होरपळ होईल. ही मोठी शिक्षा आहे असे संभाजीराजे सांगतात.
त्यानंतर शंभूराजे त्यांना एक नकाशा दाखवतात, ज्यामध्ये स्वराज्याच्या चहू बाजूंनी शत्रू उभा ठाकलेला दिसत असतो. औरंगजेब, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज अशा सर्वांची इच्छा असते की संभाजी राजांच्या हातून काही चूक घडावी जेणेकरून स्वराज्यात अराजक माजेल. शत्रूची ही इच्छा शंभूराजे सर्वांना समजावून सांगतात. त्यानंतर संभाजी राजे इंग्रजांचा एक खलीता वाचून दाखवतात, ज्यामध्ये स्पष्ट लिहिले असते की, कारभारी लोकांना आणि सोयराबाईंना संभाजी राजांनी शिक्षा दिली तर ते आपणासाठी चांगलेच आहे. नंतर आदिलशहाच्या पत्रातही असाच मजकूर असतो. गृहकलहात अडकलेले संभाजी महाराज पोरके होतील असे तो समजत असतो. हे सर्व वाचून दाखवल्यानंतर संभाजी राजे सांगतात, जर आम्ही या लोकांना शिक्षा दिली असती तर त्याच्या स्वराज्याला काहीच फायदा झाला नसता, उलट शत्रूला बरे वाटले असते म्हणून आम्ही तसे केले नाही.
त्यानंतर ते शिवाजी महाराजांची शिकवण सांगतात, असे प्रसंग उभे राहिले तर काय निर्णय घ्यावा त्यसाठी आबासाहेबांनी दिलेला सल्ला सांगतात. त्यामुळे फक्त स्वराज्यासाठी आम्ही विवेकी वागलो. आम्ही सबुरीने घेतले. हे ऐकल्यावरही राणूबाईंना त्या मंडळींची खात्री वाटत नाही असे दिसते. पुन्हा ते तसे काही कृत्य करतीलच असे त्या सांगतात. मात्र असे काही घडले तर आपण त्यांना शिक्षा करू अशी खात्री संभाजी राजे देतात. शेवटी पुतळाबाईसाहेब अभिमानाने संभाजी राजांची तुलना शिवाजी महाराजांशी करतात. आता यावर सोयराबाई काय म्हणतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.