किशोर कदम (Photo Credit - Twitter)

Happy Birthday Kishor Kadam: उत्तम अभिनेता आणि काळजाला भिडणारे काव्यलेखन करणारे कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम (Kishor Kadam). सौमित्र (Somitra) यांचा आज वाढदिवस. किशोर कदम हे 'सौमित्र' या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे 'जावे कवितांच्या गावा आणि '... आणि तरीही मी!' हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. आजही प्रवासात, पावसाच्या सुंदर वातावरणात, प्रेमाच्या पहिल्या लहरित, विरहात, स्त्री मनाच्या भावनेत 'सौमित्राच्या' कविता भरभरून अगदी ओतपोत भावना व्यक्त करतात. (हेही वाचा  - कॅन्सर वर मात पुन्हा सज्ज झालेल्या शरद पोंक्षे साठी किशोर कदम यांचा भावनिक संदेश)

त्यांनी लिहिलेला गीतांचा अल्बम 'गारवा' हा खूप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच 'नटरंग' या रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. त्यांनी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या काही खास गाजलेल्या कवितांवर नजर टाकूयात.

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा -

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा

प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झूलते कधीचे

हिरवे किनारे हिरव्या नदीचे

पाण्यावर सरसर काजवा नवा नवा

प्रिये मनात ही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे

आता रुपेरी झालेत वारे

अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा

प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा

माझिया मना, जरा थांब ना -

माझिया मना, जरा थांब ना

पाऊली तुझ्या माझिया खुणा

तुझे धावणे अन मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना

ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू

एकटी न मी सोबतीस तू

ओळखू कशा मी तुझ्या भावना

माझिया मना, जरा ऐक ना

सांजवेळ ही, तुझे चालणे

रात्र ही सुनी, तुझे बोलणे

उषःकाल आहे नवी कल्पना

पहिला पाऊस

पहिला पाऊस पहिली आठवण

पहिलं घरटं पहिलं अंगण

पहिली माती पहिला गंध

पहिलं आभाळ पहिलं रान

पहिल्या झोळीत पहिलच पान

पहिले तळहाथ पहिलं प्रेम

पहिल्या सरीचा पहिलाच थेंब

पहिला पाऊस पहिलीच आठवण

पहिल्या घराचं पहिलच अंगण

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही ॥धृ.॥

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो

रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो

वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई ॥१॥

असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा

अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा

रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई ॥२॥

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा

कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा

असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही ॥३॥

एवढ मात्र खर - 

हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं ,

मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं

हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून,

तुझ्या माझ्या सारया जागा पाहिल्या पुन्हा फिरून ,

विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून

तू होतीस ,नव्हतीस, पण हिचं हसणं होतं ,

सोबत माझ्या हिचं असणं तुझं नसणं होत ,

खर सांगू ? हिच्या डोळ्यात माझंच फसणं होतं ,

हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं ,

मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं .

असे तसे कसेतरी जगतात काहीजण

तसं हिला जरा जरा कळत माझं मन ,

संध्याकाळी गप्प होतो हे हि हिला कळलं ,

तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळल

खरच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही ,

कुणास ठाऊक का मी विचारला हि नाही

आई म्हणते सोडून द्याव सगळ भलं बुरं ,

मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर

तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो

कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो ,

तुझी आठवण येते आहे हिला आधी कळत ,

माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळत ,

ओंठ ठेवते गालांवर समजून घेते खूप,

भळभळनार्या जखमेवरच हे असं साजूक तूप ,

जगण्यासाठी आता मला एवढाच सुख पुरं ,

मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर……..

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे

मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे

नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे

निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे

उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे

जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे

असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पवसाळे नवे व्हायचे

ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवयाचे.

मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे

मना भोवती चंद्र नव्हता तरीहि मनाला किती शुभ्र वाटायचे.

आता सांज वेळी निघोनी घरातून दिशहीन होउन चालायचे

आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

मुंबईच्या खार-कोळीवाडा भागात किशोर कदम यांचे बालपण गेले. त्यांनी बी.कॉम पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले. त्यांना यंदाचा आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा 'केशवकुमार पुरस्कार' प्राप्त झाला आहे. तसेच यावर्षीचा महाराष्ट्र राज्यपातळीवरचा २० वा 'राय हरिश्चंद्र साहनी' ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कारही कदम यांनी मिळाला आहे.