नाटकांचे विविध प्रकार असतात. ते स्थळ, काळ आणि सादरीकरणानुसार ठरतात. असाच एक नाट्यप्रकार म्हणजे 'एकपात्री नाटक'. एकाच व्यक्तिने कोणताही विषय रंगमंचावरुन अभिनयासह सादर करणे म्हणजे एकपात्री नाटक. एकपत्री नाटक सादर करणाऱ्या कलावंतांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. अर्थात, प्रत्येक कलाकार हा व्याप्त स्वरुपात एकपात्री कला सादर करत नसल्यामुळे किंवा त्या कलाकारांना भाषा आणि ठराविक प्रदेशाच्या सीमा भेदता न आल्याने हे एकपात्री प्रयोग काही प्रदेशांपुरते मर्यादित राहतात. विविध ठिकाणी प्रसारित झालेल्या आकडेवारीनुसार आजघडीला महाराष्ट्रात सुमारे ५०० कलाकार एकपात्री नाटकाचे जाहीर प्रयोग करतात.
मराठी रंगभूमिवर अनेक दिग्गजांनी एकपात्री नाटकांचे प्रयोग केले आहेत. जवळपास हे सर्वच प्रयोग हे अजरामर झाले आहेत. तसेच, मराठी रंगभूमिवरचा मैलाचा दगड म्हणूनही ओळखले गेले आहेत. अभिनय, आवाज आदिंच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकाला खिळवून ठेवणे हे एकपात्री नाटक करणाऱ्या कलाकारासमोरचे मोठे आव्हान. हे आव्हान जो कलाकार पेलतो तो खऱ्या अर्थाने एकपात्री प्रयोग यशस्वी करतो. हे आव्हान लिलया पेलणाऱ्या कलाकाराला आपल्या प्रयोगाची जाहिरात करण्याची गरज भासत नाही. लोक स्वत: त्याच्या अभिनयाला दाद देत त्याच्या नाटकाची प्रसिद्धी करतात. त्यामुळ आपसुकच नाटकाला प्रसिद्धी मिळतेच. पण, तो अभिनेताही लोकप्रिय होतो.
मराठीत गाजलेले एकपात्री प्रयोग आणि त्याचे सादरकर्ते
पु.लं. देशपांडे - बटाट्याची चाळ, असा मी असामी, सुमन धर्माधिकारी - घार हिंडते आकाशी, वि.र गोडे - अंतरीच्या नाना कळा, सदानंद जोशी - मी आत्रे बोलतोय, प्रा. लक्ष्मण देशपांडे - वऱ्हाड निघालंय लंडनला, दिलीप प्रभावळकर - माझ्या भूमिका, मुखवटे आणि चेहरे, राम नगरकर - रामनगरी, लालन सारंग - मी आणि माझ्या भूमिका, शिरष कणेकर - माझी फिल्लमबाजी, फटकेबाजी, कणेकरी, सुषमा देशपांडे - व्हय मी सावित्रीबाई, वसंत पोतदार - योद्धा संन्याशी, रे आदि.
काही वेगळ्या धाटणीचे एकपात्री
शरद उपाध्ये - राशीचक्र, डॉ. रविराज अहिरराव - वास्तुविराज, विवेक मेहत्रे - राशीवर्ष आदि. अर्थात, या प्रयोगांना थेट एकपात्री असे म्हणता येणार नाही. पण, साधारण एकपात्रीच्या धाटणीत मोडणारे आहेत.