Marathi Theatre | Representational image (Photo Credits: pxhere)

मराठी थिएटर (Marathi Theatre), ज्याला सहसा "मराठी रंगभूमी" (Marathi Rangbhumi Din 2023) असे संबोधले जाते. ज्याचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. मराठी रंगभूमी म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदलासाठी यांचा एक ठेवा आहे. म्हणूनच हा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. हा विशेष दिवस मराठी रंगभूमीच्या (Marathi Rangbhumi) दिग्गजांना आदरांजली वाहण्याची आणि या कलाप्रकाराच्या अदम्य भावनेची कदर करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. हा दिवस म्हणजे कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव. चला मराठी रंगभूमीच्या वाटचालीचा थोडक्या आढावा आणि महत्त्व जाणून घेऊया.

मराठी रंगभूमी दिन थोडक्यात इतिहास

जागतिक स्तरावर रंगभूमी दिन 27 मार्च रोजी साजरा होत असला तरी, मराठी रंगभूमी दिन मात्र 5 नोव्हेंबरलाच साजरा होतो. विष्णूदास भावे यांनी मराठी नाट्यपंढरीचा पाया घातला. सांगली येथे दिनांक 5 नोव्हेंबर येथे 1843 रोजी मराठीतील पहिल्या गद्य पदमिश्रित नाटकाचा प्रयोग रंगला. हा प्रयोगच नाट्यसृष्टीचा पाया ठरला. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर 'सीता स्वयंवर' हे मराठी भाषेतील पहिले नाटक पार पडले. हीच आठवण कायम ठेऊन पुढे या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाऊ लागला.

मराठी रंगभूमीची व्याप्ती

मराठी रंगभूमी ही केवळ अभिनेते आणि पटकथा अथवा नाटकाची संहिता नव्हे. त्याही पलिकडे जाऊन खरे र ती एक चळवळ आहे. ज्यात नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, नैपथ्य, वेशभुषा आणि केशभुषा कलाकार यांच्यासह उत्साही प्रेक्षक यांचा समावेश आहे. मराठी रंगभूमी दिन हा बहुआयामी कलाप्रकार घडवणाऱ्या सर्व घटकांना समर्पीत आहे. ज्यांचा या दिवशी सन्मान केला जातो. मराठी रंगभूमीचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यातील वैविध्य. जे प्रायोगिक, पारंपारिक आणि लोकनाट्य प्रकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते. मराठी रंगभूमी दिन हा एक असा दिवस आहे जेव्हा या सर्व वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती एकत्र येतात, विविधतेतील एकतेला बळकटी देतात. आजवर मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात हातांचे, समर्पणांचे स्मरण या दिवशी केले जाते.

माराठी रंगभूमी आणि नाविन्य

मराठी रंगभूमीला खोलवर रुजलेली परंपरा असली, तरी ती समकालीन संकल्पना आणि कथाकथन तंत्रांशी जुळवून घेत आहे. नवीन काळातील नाटककार आणि दिग्दर्शक कलेच्या सीमा ओलांडून अज्ञात प्रतिभेचा शोध घेत आहेत. म्हणूनच पाठिमागील काही वर्षांमध्ये मराठी नाटकांची पताका सातासमुद्रापार पोहोचली आहे.