मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या
मराठी रंगभूमी दिन (Photo Credits: File Image)

प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच.. लाल मखमली पडदा.. म्युझिकचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग.. तिसरी घंटा.. आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी समोर बसलेले प्रेक्षक, हे वातावरण डोळ्यासमोर येताच कोणत्याही रंगकर्मींच्या अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. या रुजलेल्या बीजाची एक फांदी म्हणजे मराठी नाटक (Marathi Natak). 1843 साली सीता स्वयंवर (Seeta Swayamvar) या नाटकाच्या रूपात सुरु झालेला हा प्रवास अलीकडच्या संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhli), अनन्या (Ananya), अलबत्त्या गलबत्त्या (Albatya Galbatya) पर्यंत दिवसागणिक आणखीनच प्रगल्भ होत चालला आहे. मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी 5 नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी मराठी रंगभूमी दिन (Marathi Rnagbhumi Din) साजरा केला जातो हे तर सर्वांना ठाऊक आहेच पण त्यामागील कारण आपण जाणता का?

1843 मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. 1943 साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला होता.

दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यंदा हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे.

दरम्यान, मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत काही बड्या कंपन्यांच्या पुढाकाराने अनेक नवीन मराठी नाटके तसेच जुन्या नाटकाचे रिमेक गाजत आहेत.170 वर्षाची ही मराठी नाटकाची परंपरा येत्या काळात आणखीनच वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा आणि सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा