Rohini Hattangadi (Photo Credits: Instagram)

मराठी रंगभूमीवरील सर्वात मानाचा असा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार (Vishnudas Bhave Gaurav Padak Award) यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त (Rangbhumi Din) म्हणजेच 5 नोव्हेंबर चे औचित्य साधून रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा हा मान रोहिणी यांना प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप गौरव पदक, 25 हजार रुपये रोख असे असून यंदा देखील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रोहिणी हट्टंगडी यांनी रंगभूमीसोबतच मराठी व हिंदी सिनेसृष्टीत तसेच मालिकांमध्ये अनेक भूमिका गाजवल्या आहेत. अलीकडेच मोहन जोशी यांच्या सोबत त्यांनी नटसम्राट या एव्हरग्रीन नाटकातून प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा आपली जादू दाखवली होती. यातील अनेक भूमिकांसाठी त्यांना मानाचे पुरस्कार देण्यात आले होते, यामध्ये फिल्मफेअर पासून ते BAFTA अवॉर्ड पर्यंत पुरस्कारांची मोठी यादी पाहायला मिळते.

मराठी रंगभूमी वर सुरू असलेली ही '5' सध्याची धम्माल नाटकं पाहिलीत का?

प्राप्त माहितीनुसार, विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. याच्या स्मरणार्थ 1943 साली नाट्य क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी एकत्र सांगली येथे 5 ते 7  नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो, तसेच वभावे यांच्या नावानेच हा पुरस्कार देखील दिला जातो.

यापूर्वी अनेक मातब्बर कलाकरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मागील वर्षी म्हणजेच 2018 साली डॉ. मोहन आगाशे यांना तर 2017 साली मोहन जोशी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.