'व्वा उस्ताद व्वा!' या शब्दाने ज्याने भारतातील प्रत्येक संगीतप्रेमीच्या हृदयात घर केले, त्याच झाकीर हुसेन यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 73 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे पंडित झाकीर हुसेन यांनी आपल्या तबल्याच्या तालावर संगीताला नवी उंची दिली होती. त्यांच्या निधनाने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसेन हे भारतीय शास्त्रीय संगीतातील तेजस्वी तारा होते. तबल्यावर त्यांच्या बोटांची जादू अशी होती की प्रत्येक चाहत्यांची एकच प्रतिक्रीया असायची ती म्हणजे 'वाह उस्ताद वाह!'. त्यांनी भारतीय संगीताला भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवून दिली. तबला वादन या कलेला त्यांनी एक नवी ओळख देत एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. तबल्यावर त्यांची बोटे अशी चालत की तबल्यावरचे जादूगारच ते वाटत. (हेही वाचा - Tabla Maestro Zakir Hussain Dies: तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन)
बालपणापासूनच संगीताच्या दुनियेत प्रवेश केलेल्या झाकीर यांना आपल्या uवारसा हा वडिलांकडून मिळाला आणि ते देखील तबल्याचे वस्ताद झाले. झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी झाला होता आणि त्यांचे वडील महान तबला वादक उस्ताद अल्ला रखा हे होते. सुरुवातीचे संगिताचे धडे त्यांनी आपल्या वडिलांकडेच गिरवले.
तबल्याचा जादूगार : झाकीर हुसेन यांचा प्रवास
झाकीर हुसेन हे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताच्या मिश्रणासाठी ओळखले जात होते. त्यांच्या तबल्याचे ताल अनोखे होते. पंडित रविशंकर, हरिप्रसाद चौरसिया आणि अली अकबर खान यांसारख्या दिग्गजांशी त्यांची जोडी अतुलनीय होती. झाकीर हुसेन यांना पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांना 'तबल्याचा शहेनशाह' म्हटले गेले.
झाकीर हुसेन यांच्या निधनाने भारतीय संगीताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांनी तबल्याला वेगळी ओळख दिली. त्यांनी संगीत ही केवळ कला नसून एक आध्यात्मिक अनुभव मानला.