गेल्या काही वर्षांमध्ये भारत (India) आणि चीनचे (China) संबंध बरेच ताणले गेले आहेत. अशात आता भारताकडून आयोजित केल्या जाणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेकडे जगाचे लक्ष लागले आहे. अहवालानुसार, या शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) सहभागी होणार असल्याची बातमी आहे. शुक्रवारी अधिकृत घोषणेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अध्यक्ष शी जिनपिंग 4 जुलै रोजी बीजिंगमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी भारतामध्ये येण्याचे शी जिनपिंग यांनी टाळले आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित राहून अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडतील. भारतातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत शी यांच्या सहभागाबाबतची ही पहिली अधिकृत घोषणा आहे. भारत आणि चीनमधील सीमा विवादामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे. त्यामुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष एससीओच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही एक प्रभावी आर्थिक आणि सुरक्षा संघटना आहे, जी जगातील सर्वात मोठ्या आंतरप्रादेशिक संस्थांपैकी एक आहे. 2021 मध्ये एका शिखर परिषदेदरम्यान त्याची स्थापना करण्यात आली होती. रशिया, चीन, किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे त्याचे संस्थापक सदस्य देश आहेत. भारत 2017 मध्ये त्याचा स्थायी सदस्य झाला. यावर्षी परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. (हेही वाचा: US Race-Based Admissions: यूएस कोर्टाकडून वंश आधारीत प्रवेश रद्द; कमला हॅरीस यांच्यासह अनेकांकडून टीकास्त्र, संधी नाकारण्याचाही आरोप)
सध्या या संस्थेमध्ये 8 प्रमुख सदस्य देश आहेत, ज्यात कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. या वर्षी जुलैमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसह इराण त्याचा सदस्य होईल. तर बेलारूस देखील सदस्य होण्यासाठी रांगेत आहे. दरम्यान, एससीओ शिखर परिषद गेल्या वर्षी समरकंद, उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह संघटनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.