कोविड-19 परीक्षेत जग अपयशी- WHO Chief Tedros Adhanom
WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus. (Photo Credits: Getty Images)

कोविड-19 (Covid-19) ही परीक्षा असून त्यामध्ये संपूर्ण जग अपयशी ठरत आहे, असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) डिरेक्टर जनरल टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी केले आहे. जर संपूर्ण जगभरामध्ये लसींचे वाटप समान प्रमाणात झाले असते तर आतापर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यात मदत झाली असती, असेही ते म्हणाले. 138 व्या जागतिक ऑलिंपिक कमिटीच्या सत्रामध्ये (138th International Olympic Committee Session) बोलताना ते म्हणाले.

जगामध्ये होणाऱ्या लसींच्या उत्पादन आणि वितरणाचे खरे रुप आता समोर आले असून ही मानवी इतिहासातील खेदजनक परिस्थिती आहे. अजूनपर्यंत संपूर्ण जगात 40 लाखांहून अधिक लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. या वर्षातील काही महिन्यांमध्ये झालेल्या मृतांची संख्या ही गेल्यावर्षी पेक्षा दुप्पट आहे, असेही ते म्हणाले. (कधी संपणार Coronavirus महामारी? आता COVID-19 वर विजय मिळवण्यासाठी लस हीच मोठी आशा- WHO Chief Tedros Adhanom)

जागतिक पातळीवर लस, उपकरणे, ऑक्सिजन सिलेंडर्स यांचे समान वाटप करण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे जगातील काही भागांमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे. कोरोनाचे संकट सुरु होऊन 19 महिने झाले तर पहिली लस शोधून 7 महिने होऊन गेले आहेत. तरीही अविकसित देशांमध्ये 1 टक्के लोकांना लस मिळाली आहे. तर विकसित देशांमध्ये लसीकरण खूप जास्त आहे. एकूण लसींपैकी 95% लसी या फक्त 10 मोठ्या देशांनाच मिळाल्या आहेत. काही विकसित देश तिसऱ्या बुस्टर डोसबद्दल चर्चा करत आहेत. तर अविकसित देशांमधील आरोग्य कर्मचारी, वृद्ध माणसे लसीची वाट पाहत आहेत. लसीच्या वितरणातील हा भेदभाव जोपर्यंत कायम राहील तेवढे कोरोनाचे संकट वाढत राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तसंच अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. जग हे कोरोनाच्या पुढच्या लाटेच्या पायथ्याशी आहे. प्रत्येक देशातील कमीत कमी 10 टक्के नागरिकांचे लसीकरण सप्टेंबरपर्यंत होणे गरजेचे आहे. डिसेंबरपर्यंत 40 टक्के तर पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत 70 टक्के लोकांचे लसीकरण झाल्यास कोरोनाचे संकट लवकर टाळता येईल आणि त्यामुळे जागतिक अर्थचक्र सुरळीत होऊ शकेल, असेही ते म्हणाले.