Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

जगात कोरोना व्हायरसने (Coronavirus) महारूप धारण केले आहे. जवळजवळ सर्व देशांत हे विषाणू पोहचले आहेत. भारतातही कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. सध्या फ्लूपेक्षा कोरोना विषाणू धोकादायक असल्याचे समजत आहे, परंतु तो नियंत्रित केला जाऊ शकतो. हा विषाणू 'सार्स' (SARS) आणि 'मर्स' (MERS) नाही किंवा तो इन्फ्लूएंझा देखील नाही.

कोविड-19 बाबत जगातील मृत्यूदर (Global Death Rate) 3.4 टक्के इतका झाला आहे. त्या तुलनेत फ्लू ग्रस्त रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom) यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणू संदर्भात जगभरातील आकडेवारी समोर आल्यानंतर, असा अंदाज बांधला जाऊ शकतो की, परिस्थिती बरीच भयावह झाली आहे. आतापर्यंत हा विषाणू 60 देशांमध्ये पसरला आहे. एकट्या चीनमध्ये मृतांचा आकडा 2900 च्या वर गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृत्यूची संख्या 3100 असल्याचे सांगितले जात आहे. यासह, 93 हजार लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

चीननंतर इटली, इराण आणि दक्षिण कोरियामध्ये हे संक्रमण झपाट्याने पसरले आहे. इराणच्या 8% संसदेत कोरोनाव्हायरस पसरला आहे, तर देशात 77 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकाही यातून सुटली नाही, आतापर्यंत तिथे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाची जवळपास 25 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. (हेही वाचा: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केल्या शाळांसाठी महत्वाच्या सूचना)

दरम्यान, डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, चीनने कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची प्रकरणे कमी झाल्याचे सांगितले आहे. या विषाणूमुळे व्यवसायांचे नुकसान भरून काढण्यासाठी दक्षिण कोरिया 9.8 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. ही परिस्थिती पाहता टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलले जाऊ शकते.

Corona Virus पासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी - Watch Video 

या विषाणूबाबत अद्याप कोणतीही लस विकसित केली गेली नाही, परंतु तरीही हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे  लोकांनी घाबरण्याची गरज नाही.