भारतात कोरोना विषाणूच्या 28 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. त्यानंतर आता मोदी सरकार सतर्क झाले आहे. दिल्लीशेजारील नोएडामध्ये यापूर्वीच अनेक शाळा काही कालावधीकरीता बंद केल्या असून, संशयितांवर एकांतात उपचार चालू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मानव संसाधन विकास मंत्रालयाने बुधवारी शाळांसाठी खास सूचना जारी केल्या आहेत.
विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये सर्व सरकारी आणि खासगी शाळांना, कोरोना विषाणूबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, परंतु नवीन कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आणि त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
Ministry of Human Resource Development issues advisory for schools regarding #Coronavirus pic.twitter.com/GnIffxOR1p
— ANI (@ANI) March 4, 2020
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासोबतच, वारंवार हात धुणे, शिंकताना किंवा खोकताना रुमाल वापरणे, आजारी असल्यास शाळेपासून दूर राहणे, जास्त गर्दी टाळणे अशा खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बुधवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत एकूण 28 रुग्ण असल्याची पुष्टी झाली आहे. यात इटलीहून भारतात आलेल्या 16 नागरिकांचा तपास अहवालही सकारात्मक आढळला आहे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एका भारतीय ड्रायव्हरमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. दुसरीकडे दिल्लीत 1, आग्रामध्ये 6, तेलंगणामध्ये 1 आणि केरळमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत. (हेही वाचा: जीवाघेण्या कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून खास सूचना जारी; अशी घ्या काळजी)
या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक रुग्णालयांमधील डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे, मानव संसाधन विकास मंत्रालयाने या विषाणूपासून बचाव करण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.