कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गापासून बचाव करण्यासाठी लस अथवा औषध निर्मिती करण्याचे काम जगभर सुरू आहे. अनेक देश त्यांनी तयार केलेल्या लसींची चाचणी घेत आहेत. पण त्यादरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींपैकी पहिली लस चाचणीमध्ये अपयशी ठरली आहे. गिलियड (Gilead) ची ही लस क्लिनिकल ट्रायल दरम्यान कोरोना व्हायरसला हरवण्यात अपयशी ठरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 'चुकून' प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, Gilead Sciences, Inc. या अमेरिकन कंपनीने कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अँटीव्हायरल लस तयार केली. परंतु ही लस चीनमधील क्लिनिकल चाचण्यांमध्ये अपयशी ठरली आहे. अहवालानुसार, अँटी-व्हायरल लस Remdesivir लस कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरली आहे. गिलियडने या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डब्ल्यूएचओने जाहीर केलेला अहवाल अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. कंपनीचा असा दावा आहे की, क्लिनिकल चाचण्यांसाठी जास्त लोक चीनमध्ये सापडले नाहीत व त्यामुळे अद्याप या लसीची चाचणी पूर्ण झाली नाही.
या चाचणीसाठी संशोधकांनी 237 रुग्णांचा अभ्यास केला. यापैकी 158 रूग्णांना Remdesivir औषधोपचार देण्यात आले आणि तर 79 जणांना प्लेसबो देण्यात आला. एका महिन्यानंतर, Remdesivir घेतलेल्या रूग्णांपैकी 13.9 टक्के लोकांचा मृत्यू झाला होता, तर प्लेसबो घेणार्या 12.8% लोकांचा मृत्यू झाला. या औषधाच्या दुष्परिणामांमुळे लवकरच त्याचे परीक्षण थांबविले गेले.
(हेही वाचा: Coronavirus: स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण तापमान, दमट वातावरणात मरतो कोरोना व्हायरस- व्हाइट हाउस)
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित तज्ञांचे म्हणणे आहे की बहुतेक अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी त्यांच्या लसींच्या चाचण्यांचा वेग वाढविला आहे. अशी अपेक्षा आहे की पहिली लस जून किंवा जुलैमध्ये येईल. मात्र ते सुरक्षिततेचे मानदंड किती लवकर पूर्ण करतात यावर देखील अवलंबून आहे.