
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा (Kristalina Georgieva) यांनी सोमवारी, जी-20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या प्रमुखांशी कोरोना विषाणूची (Coronavirus) स्थिती आणि त्याचे आर्थिक परिणाम याबद्दल चर्चा केली. त्यानंतर आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे 'गंभीर' आर्थिक नुकसान होत आहे. या विषाणूमुळे सध्या बाजारात आर्थिक मंदीचे (Financial Crisis) वातावरण असून, ही मंदी 2009 मधील मंदीपेक्षा अधिक धोकादायक असू शकते.
तसेच, 'आता आम्ही कोरोना व्हायरसवर किती आणि कसे नियंत्रण ठेऊ शकतो, यावर सर्व काही अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये उदयोन्मुख बाजारपेठेसह अर्थव्यवस्था असणार्या देशांनी, छोटी अर्थव्यवस्था असलेल्या देशांना अधिक आधार देण्यासाठी पुढे यावे' असे त्या म्हणाल्या. आयएमएफकडे 1 ट्रिलियन डॉलर्स कर्ज देण्याची क्षमता आहे आणि ते कर्ज देण्यास तयार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (हेही वाचा: Coronavirus ने अमेरिका हादरली; 24 तासात 100 हुन अधिक मृत्यू)
जॉर्जिवा यांनी 20 देशांच्या गटाच्या अर्थमंत्र्यांना इशारा दिला की, 2020 चा आर्थिक दृष्टीकोन नकारात्मक आहे - किमान जागतिक आर्थिक संकट किंवा त्याहून वाईट मंदीचा अंदाज वर्तविला जात आहे. 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून, जागतिक अर्थव्यवस्थामध्ये 0.6 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली होती. परंतु चीन आणि भारत यांसारख्या प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा त्या वेळी वेगाने वाढत होत्या. सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत, परिणामी व्यवसाय, बाजारपेठ ठप्प झाल्या आहेत. काही विश्लेषकांच्या अंदाजानुसार यामुळे झालेली आर्थिक घसरण ही 1.5 टक्क्यांपर्यंत असू शकते.