कोरोना व्हायरस महामारी ही WHO ने घोषित केलेली आतापर्यंतची 'सर्वात गंभीर' आपत्कालीन परिस्थिती; जगात गेल्या 4 दिवसांत 10 लाख रुग्णांची नोंद, एकूण संख्या 1.6 कोटींच्या वर
WHO Chief Tedros Adhanom Ghebreyesus | File Image | (Photo Credits: Twitter/@WHO)

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण प्रत्येक देशात वाढत आहे. अशात डब्ल्यूएचओने (WHO) सांगितले की, कोरोना व्हायरस ही डब्ल्यूएचओने घोषित केलेली 'सर्वात गंभीर' आपत्कालीन परिस्थिती ('Most Severe' Global Health Emergency) आहे. जगामध्ये सध्या या विषाणूच्या संक्रमणाने 1.6 कोटी रुग्णांचा आकडा पार केला आहे. केवळ चार दिवसांत जागतिक पातळीवर दहा लाखांची वाढ झाली आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये दररोज हजारो नवीन घटना समोर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेतही दिवसभरात 10 हजाराहून अधिक नवीन रुग्ण पाहायला मिळत आहेत, तर स्पेन, बेल्जियम आणि हाँगकाँगसारख्या ठिकाणी या आजाराच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus म्हणाले, केवळ सहा आठवड्यांतच कोरोना विषाणू रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. अशाप्रकारे आज डब्ल्यूएचओने हा साथीचा रोग सर्वत्र वाढत जाण्याचा इशारा दिला. मात्र सध्या रुग्ण संख्या विक्रमी पातळीवर वाढत असताना, जागतिक मृत्यू दर आठवड्याला सुमारे 30,000 ते 40,000 पर्यंत स्थिर राहिले आहेत. Tedros पुढे म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची ही सहावी वेळ आहे, परंतु आताची महामारी सर्वात गंभीर आहे. 30 जानेवारी रोजी आरोग्य आणीबाणी जाहीर झाली तेव्हा चीनबाहेर 100 पेक्षा कमी रुग्ण आढळले होते.' (हेही वाचा: Bolivia देशात कोरोना विषाणूची भयावह स्थिती; गेल्या 5 दिवसांत रस्ते व घरांमध्ये आढळले 400 हून अधिक मृतदेह)

डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, 4 एप्रिल रोजी जगात दहा लाख रुग्णांची नोंद झाली, त्यावेळी पश्चिमेकडील बहुतेक भाग लॉकडाऊनमध्ये होते. आरोग्य आणीबाणी जाहीर झाल्यानंतर 114 दिवसानंतर 23 मे रोजी, जगात पाच दशलक्ष प्रकरणे आढळली. परंतु पुढील पाच दशलक्ष प्रकरणे होण्यास केवळ 36 दिवस (28 जून) लागले. त्यानंतर 23 जुलै पर्यंत, अवघ्या 26 दिवसांत जगात 1.5 कोटी रुग्ण आढळले व आता 4 दिवसांनी ही संख्या 1.6 कोटींवर पोहोचली. यामध्ये अमेरिका, ब्राझील व भारत हे सर्वात प्रभावित देश आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 49,931 रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्यात ब्राझीलमध्ये दररोज सरासरी 46,000 रुग्ण समोर येत आहेत.

दरम्यान, जर्मनी आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी ही महामारी नियंत्रणात ठेवल्याबद्दल टेड्रोसने त्यांचे कौतुक केले. या देशांमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे व्यवस्थित पालन होत होते.