Coronavirus: Medical workers (Photo Credits: IANS)

जगातील बहुतेक देश कोरोना व्हायरसशी (Coronavirus) झगडत आहेत, परंतु दक्षिण  अमेरिकेतील देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय भयावह आहे. बोलिव्हिया (Bolivia) पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या 5 दिवसांत त्यांनी देशातील बड्या शहरांचे रस्ते व घरांमधून 400 हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहांची स्थिती पाहून असे दिसून येत आहे की, त्यापैकी 85% पेक्षा जास्त कोरोना विषाणूची लागण झाली असावी व त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, बोलिव्हियन शहर कोचाबंबा येथे सुमारे 191 मृतदेह सापडले आहेत. त्याशिवाय ला पाझ शहरातून 141 मृतदेह सापडले आहेत. जे एकतर घरात सडलेले होते किंवा रस्त्यावर विखुरलेले होते.

राष्ट्रीय पोलिस संचालक कर्नल इव्हान रोजस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अशी भयंकर परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती. देशातील सर्वात मोठे शहर सांता क्रूझच्या (Santa Cruz) रस्त्यांवरूनही 68 मृतदेह सापडले आहेत. केवळ या शहरातच देशातील 50% कोरोना विषाणू संसर्गाच्या घटना समोर आल्या आहेत.  आतापर्यंत या एका शहरात 60 हजाराहून अधिक कोरोना विषाणू प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रोजस म्हणाले की, सापडलेल्या मृतदेहांपैकी 85 टक्केहून अधिक मृतदेह कोरोना संक्रमित आहेत. यामधील काहींची चाचणी घेण्यात आली आहे, तर इतरांची लक्षणे पाहून अनुमान काढता येईल. (हेही वाचा: ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हायरस लसीच्या चाचण्यांनी दाखवले सकारात्मक परिणाम; Safe, Well-Tolerated आणि Immunogenic असल्याचा दावा)

यातील काही लोक इतर रोग, उपासमार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील मरण पावले आहेत. नॅशनल एपिडेमिओलॉजी ऑफिसच्या म्हणण्यानुसार, सांता क्रूझनंतर ला पाझमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. येथे दररोज हजारो नवीन कोरोना प्रकरणे समोर येत आहेत. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनचे संचालक अँड्रेस फ्लोरेस म्हणाले की, 1 एप्रिलपासून आतापर्यंत असे 3000 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी बहुतेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. बोलिव्हियामध्ये 60 हजाराहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर कोरोनामुळे 2200 मृत्यू अधिकृतपणे झाले आहेत.