Paracetamol Overdose: पॅरासिटामॉल औषधाची अधिक मात्रा घेतल्यास यकृत निकामी होण्याचा धोका: अभ्यास
Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

वेदनाशामक (Painkiller) म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल औषधांच्या बाबतीत एडिनबर्ग युनिव्हर्सिटीने केलेल्या अलीकडील अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. पेनकिलर पॅरासिटामॉल औषधांची अधिक मात्रा सातत्याने घेत राहिल्यास त्याचे आरोग्यावर धोकादायक परिणाम (Overdosage Toxicity) होतात. इतकेच नव्हे तर शरीरातील अवयव निकामी होण्याचा धोकाही संभवतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे पॅरासिटामॉल ओव्हरडोस (Paracetamol Overdose) टाळणे केव्हाही चांगले, असा हा अभ्यास सूचवतो. एडिनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासात पॅरासिटामॉल सेवन केल्यानंतर त्याचा शारीरिक अवयवांवर होणारा परिणाम तपासण्यात आला. त्यासाठी संशोधकांनी उंदरावर काही प्रयोग केले आणि पॅरासिटामॉल औषधांचा यकृतावर आणि त्यांच्या पेशींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. निष्कर्षामध्ये जाणवले की, यकृताला मोठ्या प्रमाणावर धोका आणि काही प्रकरणांमध्ये ते कायमचे निकामी होते.

आरोग्यसेवेतील व्यावसायिकांपुढे मोठ आव्हान

अभ्यासामध्ये पुढे आलेले निष्कर्ष वैद्यकीय संशोधन आणि रुग्णांच्या काळजीसाठी महत्त्वपूर्ण परिणाम दर्शवतात. पॅरासिटामॉल ओव्हरडोज हे पाश्चात्य जगात तीव्रतेने यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. जे आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी एक मोठे आव्हान आहे. पॅरासिटामॉलचे विषारी परिणाम ज्या गुंतागुंतीच्या मार्गांनी होतात ते समजून घेणे यकृतावरील त्याचा हानिकारक प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. (हेही वाचा, Essential Medicines Price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आता औषधही महागले; Paracetamol सह 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार)

औषधांच्या अतिसेवनामुळे यकृताच्या कार्यात अडथळा

एडिनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासात पॅरासिटामॉलचे यकृताच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत. पॅरासिटामॉल हे एक सामान्य वेदनाशामक औषध आहे, जे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अभ्यासातील प्रमुख निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, पॅरासिटामॉल यकृताच्या पेशींच्या संरचनेच्या अखंडतेमध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे यकृतामधील निरोगी कार्यासाठी जबाबदार असलेल्या महत्त्वाच्या पेशींच्या निर्मितीमध्ये आणि कार्यात अडथळा आणू शकते. हा व्यत्यय, अडथळा यकृताचे कार्य बिघडवू शकतो आणि संभाव्यतः पेशींच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. ज्यामुळे सोरायसीस, हिपॅटायटीस आणि यकृताच्या कर्करोगासारखा आजार संभवतो. (हेही वाचा, Maharashtra: Omicron चा संसर्ग झालेल्या 60 वर्षाखालील नागरिकांसाठी Paracetmol चा वापर करुन उपचार देऊ शकतात, कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांची महिती)

पाश्चात्य जगामध्ये पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस हे यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. स्कॉटिश नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिससह एडिनबर्ग आणि ओस्लो विद्यापीठातील संशोधकांचा समावेश असलेला हा संयुक्त अभ्यास जटिल वैद्यकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन अधोरेखित करतो. या महत्त्वपूर्ण संशोधन उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ कार्यालय आणि जैवतंत्रज्ञान आणि जैविक विज्ञान संशोधन परिषद यांचे आर्थिक सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. दरम्यान, हा अभ्यास मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याची भावना जगभरातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.