पाकिस्तानने (Pakistan) मलेरिया नियंत्रणासाठी एक मोहीमच (Malaria Control Campaign ) हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पाकिस्तान भारताकडून तब्बल 6 दशलक्ष मच्छरदाण्या (Mosquito Nets) खरेदी करणार आहे. पाकिस्तानमध्ये नुकताच महापूर येऊन गेला. या महापुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठाच प्रश्न उद्भवला आहे. प्रामुख्याने मलेरिया आजार सर्वत्र पसरला आहे. या आजाराने इतकी दहशत माजवली आहे की, मलेरिया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पाकिस्तानने मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली आहे. मलेरियासोबतच इतरही साथीचे रोग पाकिस्तान सरकारसमोर आव्हान उभे करत आहेत. त्यामुळे पाकिस्तान शेजारी राष्टं आणि जागतिक आरोग्य संघटनांकडेही मदत मागत आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) पाकिस्तानसाठी नेट मिळवण्यासाठी ग्लोबल फंडाद्वारे प्रदान केलेली आर्थिक संसाधने वापरत आहे, असे जिओ टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. WHO अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही शक्य तितक्या लवकर मच्छरदाणी मिळविण्यासाठी योजना आखत आहेत. आशा आहे की त्या पुढील महिन्यापर्यंत वाघा (बॉर्डर) मार्गाने मिळतील. (हेही वाचा, Arrest Warrant Against Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अटक वॉरंट, जाणून घ्या कारण)
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत मलेरियाच्या साथीमध्ये संसर्ग होऊन, 1,700 हून अधिक लोक मारले गेले आहेत. महामारीच्या तडाख्याने 33 दशलक्ष विस्थापित झाले आहेत. प्रामुख्याने पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग जूनच्या मध्यापासून अभूतपूर्व पावसामुळे आलेल्या सर्वात भीषण पुरामध्ये पाण्याखाली गेला. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ते पूर्व पदावर आणण्यासाठी पाकिस्तान सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सप्टेंबरमध्ये इशारा दिला होता की, मलेरियासारख्या रोगांची वाढ पाकिस्तानसाठी "दुसरी आपत्ती" होऊ शकते. पाठिमागच्या आठवड्यात, WHO ने जानेवारी 2023 पर्यंत पूरग्रस्त पाकिस्तानमधील 32 जिल्ह्यांमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या 2.7 दशलक्ष पर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता.
पाकिस्तानमध्ये 32 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा प्रसार वेगाने होत आहे. या ठिकाणी हजारो मुलांना डासांमुळे होणा-या रोगाची लागण झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात भारताकडून मच्छरदाणी खरेदी करण्याची परवानगी मागितली होती, असे सरकारच्या अहवालात म्हटले आहे.