Arrest Warrant Against Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अटक वॉरंट, जाणून घ्या कारण
Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Ex Pak Prime Minister Imran Khan) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इस्लामाबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात मरगल्ला पोलीस ठाण्याच्या क्षेत्र दंडाधिकाऱ्यांनी माजी पंतप्रधानांविरुद्ध हे अटक वॉरंट जारी केले आहे. मात्र शुक्रवारी (30 सप्टेंबर) इम्रान खान इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले होते आणि त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांची माफी मागितली होती. इम्रान खान यांनी एका प्रचारसभेत महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकी दिली होती.

20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील एका रॅलीदरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी त्यांचे सहकारी शाहबाज गिल यांच्यासोबत केलेल्या वर्तवणूकीबाबत उच्च पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली होती. शाहबाज गिलला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

इम्रान खान यांनी न्यायाधीश जेबा चौधरी यांना सांगितले होते की, त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार असल्याने त्यांनी यासाठी तयार राहावे. पोलिसांच्या विनंतीवरून न्यायाधीश जेबा चौधरी यांनी शाहबाज गिलची दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. रॅलीतील 69 वर्षीय इम्रान खान यांच्या भाषणाच्या काही तासांनंतर, त्यांच्यावर पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर राज्य संस्थांना धमकावल्याबद्दल दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याच प्रकरणी इम्रान खान शुक्रवारी इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले. मी न्यायदंडाधिकारी जेबा चौधरी यांच्याकडे माफी मागण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले. ते म्हणाले, जर माझ्या बोलण्याने त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. यानंतर इम्रान खान कोर्टातून बाहेर पडले. (हेही वाचा: पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी, सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय)

शनिवारी (1 ऑक्टोबर) त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात (IHC) अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकावल्याबद्दल प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले आहे, त्यात असे म्हटले आहे की, 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील एका सार्वजनिक रॅलीत आपल्याकडून सीमा ओलांडली गेली व त्याबाबत मी माफी मागतो.