तुम्ही लोकांना घरे, जमीन, फार्म हाऊस अशा गोष्टी खरेदी करताना पाहिले असेल किंवा ऐकले असेल. परंतु एखाद्या व्यक्तीने संपूर्ण बेट (Island) विकत घेतल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे? कदाचित नाही. जगात अनेक अब्जाधीशांची स्वतःची बेटे आहेत, जिथे ते चैनीचे जीवन व्यतीत करतात. परंतु नुकतेच दोन व्यक्तींनी कॅरेबियन समुद्रात एक बेट (Caribbean Island) विकत घेतले आहे आणि जे त्यांनी स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. हा कदाचित जगातील पहिला देश असेल, जो काही लोकांनी पैसे जमवून विकत घेतला आहे.
गॅरेथ जॉन्सन आणि मार्शल मेयर यांनी लोकांना दाखवून दिले की, कोणतीही गोष्ट जर का योजनाबद्ध पद्धतीने केली तर काहीही शक्य आहे. CNN नुसार, या दोघांनी हे संपूर्ण बेट क्राउडफंडिंग (लोकांकडून पैसे मागून) विकत घेतले आहे.
गॅरेथ जॉन्सन आणि मार्शल मेयर यांनी 2018 मध्ये 'लेट्स बाय अॅन आयलंड' नावाचा प्रकल्प सुरू केला. ज्यासाठी क्राउडफंडिंग करण्यात आले. लोकांकडे पैसे मागताना, तुम्ही ज्याला घर म्हणू शकता अशा बेटाच्या भागाचे मालक होण्यासाठी गुंतवणूक करा, असे सांगण्यात आले होते. डिसेंबर 2019 पर्यंत, अनेक लोकांनी हे बेट खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आणि अशाप्रकारे त्यांनी जवळपास 2.5 कोटी रुपये उभे केले.
View this post on Instagram
यानंतर त्यांनी कॅरिबियन देश बेलीझजवळ कॉफी के (Coffee Caye) नावाचे बेट विकत घेतले, जे 1.2 एकरमध्ये पसरलेले बेट आहे. या बेटाचा आकार कॉफी बीनसारखा आहे, म्हणून त्याला 'कॉफी के' असे नाव पडले आहे. मार्शल मेयर यांनी सीएनएनला सांगितले की, तुम्ही स्वतः गुंतवणूक केलेल्या बेटावर पाऊल ठेवणे ही एक अद्भुत अनुभूती आहे. त्यानंतर त्यांनी एका राष्ट्र उभारणीच्या प्रकल्पावरही काम सुरू केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेटाच्या गुंतवणूकदारांनी या बेटाचा देश म्हणून विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या मालकांनी बेटाला ‘प्रिंसिपॅलिटी ऑफ आयलँडिया’ असे नाव दिले. बेटाचे स्वतःचे लोकशाही सरकार, स्वतःचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत आहे. या मायक्रॉनेशनवर 249 नागरिक राहतात, ज्यांनी 1500 रुपयांमध्ये या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. (हेही वाचा: जर्मनीमध्ये पसरला ओमिक्रॉनचा BA.2 व्हेरिएंट; आरोग्य मंत्री म्हणाले, परिस्थिती 'गंभीर' आहे)
इतकेच नाही तर लोक या बेटाचे शेअर्स 2 लाख रुपयांना विकत घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क मिळेल. बेटावर प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे. या बेटावर राहण्यासाठी आणि नागरिकत्व घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील.