
Omicron BA.2 Variant Spreads in Germany: कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. ही महामारी अजूनही जगाची पाठ सोडत नाही. दरम्यान, ओमिक्रॉन (Omicron) च्या नवीन प्रकारामुळे जर्मनीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. Omicron चा नवीन प्रकार BA.2 जर्मनीमध्ये कहर करत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. तो अजूनही "गंभीर" स्थितीत असल्याचा इशारा देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना दिला आहे.
गेल्या महिन्यात जर्मनीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आता अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 9 दिवसांपासून देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. (वाचा - दिलासादायक! बुस्टर डोस Omicron विरूद्ध लसीची प्रभावीता 88% पर्यंत वाढवू शकतो- UK Report)
मिळालेल्या माहितीनुसार, Omicron चे sub-variant BA.2 जर्मनीमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरस निर्बंध शिथिल केल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या 24 तासांत 250,000 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या कालावधीत 249 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी नवीन प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या सात दिवसांत प्रति 100,000 लोकांमागे 1,439 नवीन प्रकरणे आढळली.
जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मला वाटलं की ओमिक्रॉन हा एक हलका प्रकार आहे आणि तो मर्यादित प्रमाणात टिकेल. मात्र, तसे नाही. मी या परिस्थितीवर समाधानी नाही, ज्यामध्ये दररोज 200 ते 250 लोक मरत आहेत. येत्या आठवडाभरात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.