Norovirus in UK: कोविड-19 नंतर आता ब्रिटनमध्ये नोरोव्हायरसचा धोका; जाणून घ्या किती घातक आहे हा विषाणू
Representational Image| (Photo Credits: Pixabay)

सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीचा सामना करीत आहे. अशात यूकेमध्ये (UK) नोरोव्हायरस (Norovirus) म्हणजेच विंटर व्हॉमिटिंग बगची (Winter Vomiting Bug) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्यामते, गेल्या पाच आठवड्यांत या विषाणूच्या संसर्गाची 154 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच वर्षांत याच काळात सरासरी 53 प्रकरणे नोंदविण्यात आली. नोरोव्हायरसच्या लक्षणांमधे जास्त ताप, अंगदुखी, अचानक उलट्या होणे आणि पोट खराब होणे अशा लक्षणांचा समावेश आहे.

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रानुसार नोरोव्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे आणि अमेरिकेतल्या अर्ध्याहून अधिक अन्नजन्य आजारांना तोच कारणीभूत आहे. नोरोव्हायरसला पोटाचा फ्लू देखील म्हणतात. नोरोव्हायरसची तीव्र लक्षणे ही सामान्यत: विषाणूच्या संसर्गाच्या 12 ते 48 तासांनंतर विकसित होतात आणि सुमारे एक ते तीन दिवस टिकतात.

नोरोव्हायरस विषाणू हा संक्रमित लोकांच्या मल आणि उलट्यांमध्ये आढळतो. दूषित पाणी किंवा दूषित पृष्ठभागावरून याचा संसर्ग होऊ शकतो. सीडीसीच्या म्हणण्यानुसार नोरोव्हायरसची लागण झालेली एखादी व्यक्ती या विषाणूचे कोट्यवधी कण सोडू शकते आणि त्यातील थोडेच कण दुसर्‍यास आजारी पाडण्यासाठी पुरेसे आहेत. विष्ठेच्या नमुन्यांमधून या विषाणूची चाचणी केली जाऊ शकते.

बहुतेक लोक नोरोव्हायरसपासून कोणत्याही प्रकारचे उपचार न घेता बरे होतात, परंतु वृद्ध, लहान मुले आणि आरोग्याच्या समस्या असलेले लोक या विषाणूपासून असुरक्षित असू शकतात. अशा लोकांना संसर्ग झाल्यास त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. नोरोव्हायरसग्रस्त लोकांमध्ये बहुतेक वेळा लक्षणे दिसून येत नाहीत. हा विषाणू फार वेगाने त्याचे रूप बदलतो. एकच हॉस्पिटलमध्ये नोरोव्हायरसचे वेगवेगळे प्रकार सापडले आहेत. हा विषाणू कोणत्याही हंगामात आणि कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करू शकतो. मात्र हिवाळ्यामध्ये तो आणखी वेगाने पसरतो. (हेही वाचा: Sex Ban for Vaccinated: कोरोना विरोधी लस घेतल्यावर 3 दिवस 'सेक्स' करण्यास मनाई; Russian सरकारने जारी केला आदेश, जाणून घ्या कारण)

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा नोरोव्हायरस अधिक सक्रिय असतो. म्हणून, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका आणि भरपूर स्वच्छ पाणी आणि ज्यूस प्या. या व्यतिरिक्त, स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे.