म्यानमारमध्ये (Myanmar) ऑंग सॅन सू की (Aung San Suu Kyi) यांच्या अटकेनंतर लोकशाही वाचविण्यासाठी संघर्ष करणार्या देशातील जनतेसाठी, शनिवारचा दिवस हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला. म्यानमारमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर लोकांचा निषेध कायम आहे. लोक अजूनही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. शनिवारी देशाची राजधानी नायपिताव (Naypyitaw) येथे सैन्याने वार्षिक 'सैन्य दिवसा'निमित्त परेड केली आणि दुसरीकडे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी 100 हून अधिक लोकांना ठार केले. लोकांचे आंदोलन दडपण्यासाठी म्यानमारमधील सैन्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारात 114 लोकांचा मृत्यू झाला आहे.
लोकांच्या हत्येमुळे संपूर्ण जगात या घटनेबाबत निंदा व्यक्त केली जात आहे. जगातील 12 देशांच्या संरक्षण प्रमुखांनी रविवारी निदर्शकांच्या विरोधात झालेल्या गोळीबाराचा निषेध करत संयुक्त निवेदन दिले. संरक्षणप्रमुखांनी म्यानमारच्या सैन्याकडे आपला दृष्टीकोन सुधारणे आणि लोकांचा आवाज ऐकण्याची मागणी केली आहे. वृत्तसंस्था डीपीएनुसार अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, डेन्मार्क, ग्रीस, नेदरलँड्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे. 114 लोक ठार झाल्यानंतर शनिवारी हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.
देशातील 44 गावे आणि शहरांमध्ये सैन्याने हा नरसंहार केला आहे. ठार झालेल्यांमध्ये 13 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे, जिला सैनिकांनी तिच्या घरात घुसून गोळ्या घातल्या. म्यानमार नाऊच्या अहवालानुसार आतापर्यंत सुमारे 20 अल्पवयीन मुले या हिंसाचारात मरण पावली आहेत. म्यानमारमध्ये सत्तापालट होऊन लष्कराने सत्ता आपल्या हाती घेतली आहे. याच्या विरोधात जनता आंदोलन करत आहे. गेले कित्येक आठवडे सैन्य हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे मात्र काल सैन्याने गोळीबाराचे शस्त्र वापरले. 1 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या हा निदर्शनांमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Bangladesh: 76 किलोच्या बॉम्बने पंतप्रधान Sheikh Hasina यांच्या हत्येचा कट; 14 दहशतवाद्यांना सुनावली फाशीची शिक्षा)
म्यानमारसाठी युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींनी ट्विटरवर म्हटले आहे की, '76 वा म्यानमार सशस्त्र बल दिवस दहशत व अनादराचा दिवस म्हणून साजरा केला जाईल. मुलांसह नागरिकांची हत्या ही एक अशी कृती आहे, ज्याचा कोणताही बचाव नाही.'