Bangladesh: 76 किलोच्या बॉम्बने पंतप्रधान Sheikh Hasina यांच्या हत्येचा कट; 14 दहशतवाद्यांना सुनावली फाशीची शिक्षा
बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना (फाइल फोटो)

पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली बांगलादेशच्या (Bangladesh) एका कोर्टाने 14 इस्लामिक दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जुलै 2000 मध्ये, दक्षिण पश्चिम मतदारसंघात निवडणूक रॅलीच्या वेळी हसीना यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मंगळवारी कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ढाकाच्या रॅपिड हियरिंग ट्रिब्यूनल-1 चे न्यायाधीश अबू जफर मोहम्मद कमरूज्जमां यांनी हा निकाल दिला. 2017 मध्येही पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल दहा दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतर दोषींना 20 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आता 2000 मधील प्रकरणाबाबत सुनावणी दरम्यान नऊ जणांना तुरूंगातून न्यायालयात हजर करण्यात आले. बांगलादेश कायद्यानुसार फाशीच्या शिक्षेचा अनिवार्य आढावा घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या उच्च न्यायालय खंडाची मान्यता मिळाल्यावर दोषींना सद्य नियमानुसार फाशी दिली जाऊ शकते, असे न्यायाधीश कमरूज्जमां म्हणाले. हे सर्व दोषी बंदी घातलेल्या हरकत-उल-जिहाद बांगलादेशचे सदस्य आहेत. यातील उर्वरित पाच दोषी फरार आहेत आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये खटला चालविला गेला. सरकारने नियुक्त केलेल्या वकिलांनी कायद्यानुसार त्यांचा बचाव केला.

हरकत-उल-जिहाद बांगलादेशच्या अतिरेक्यांनी 21 जुलै 2000 रोजी दक्षिण-पश्चिम गोपाळगंजच्या कोटलीपाडा येथील मैदानाजवळ 76 किलोचा बॉम्ब ठेवला होता. या ठिकाणी हसीना निवडणूक रॅलीला संबोधित करणार होत्या. मात्र, रॅलीच्या अगोदर सुरक्षा यंत्रणांना स्फोटक साहित्य सापडले. या कटात सामील झालेले बरेच लोक अद्याप फरार आहेत. फरार दोषींना अटक किंवा आत्मसमर्पणानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी शेख हसीनांवर बर्‍याच वेळा हल्ला झाला होता. 1975 मध्ये लष्कराची सत्ता उलथून टाकल्यावर त्यांच्यावर प्रथम हल्ला करण्यात आला. शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक बंगबंधु शेख मुजीबुर रहमान आणि कुटुंबातील इतर लोक मारले गेले. हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांच्यावर जर्मनीतही हल्ला झाला. 2004 मध्ये दहशतवादविरोधी रॅलीत त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 24 जणांनी आपला जीव गमावला आणि 500 ​​हून अधिक जखमी झाले.