सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या (Corona Virus) प्रादुर्भावाने चिंतेत आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची आणि संक्रमणाची संख्या वाढतच आहे. मात्र आता इस्त्रायली (Israel) माध्यमांमध्ये असे अहवाल आले आहेत की, इथल्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसवर लस (Vaccine) तयार केली आहे. वृत्तानुसार, इस्त्रायली शास्त्रज्ञ लवकरच याची घोषणा करू शकतात. ही लस पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार तयार केली गेली असून, त्याचे परिणाम अत्यंत सकारात्मक ठरले आहेत. इस्त्रायली वृत्तपत्र हारेत्झने (Haaretz) गुरुवारी वैद्यकीय स्रोतांचा हवाला देऊन याची माहिती दिली.
वृत्तपत्राने म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत जैविक संशोधन संस्थेने (Institute for Biological Research), नुकतेच कोरोना विषाणूची जैविक कार्यक्षमता आणि वैशिष्ट्ये समजून घेण्याबाबत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या वैशिष्ट्यांमध्ये निदान क्षमता, अॅन्टीबॉडीजचे उत्पादन आणि ज्यांना विषाणूची लागण झाली आहे त्यांच्यासाठी लस विकास समाविष्ट आहे. वर्तमानपत्राच्या मते, ही तयार करण्यात आलेली लस प्रभावी आणि वापरण्यासाठी सुरक्षित मानण्यापूर्वी, विकास प्रक्रियेमध्ये अनेक चाचण्यांचा समावेश आहे. या सर्व चाचण्या होऊन ही लस बाजारात येण्यास काही काळ लागू शकतो.
परंतु, या वृत्तपत्राने या लसीबाबत प्रश्न विचारले असता, संरक्षण मंत्रालयाने याची पुष्टी केली नाही. संरक्षण मंत्रालयाने हारेत्झला सांगितले की, ‘कोरोना विषाणूची लस किंवा टेस्ट किट विकसित करण्याच्या संदर्भात या जैविक संस्थेच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही ठोस कृती घडली नाही. संस्थेचे कार्य पद्धतशीर व कृती योजनेनुसार चालते आणि त्यासाठी वेळ लागेल. जर आणि जेव्हा काही उल्लेखनीय कामगिरी घडेल, तेव्हा ते एका ठराविक व्यवस्थेद्वारे सांगितले जाईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील वृद्धाचा मृत्यू)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इंस्टीट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांना 1 फेब्रुवारी रोजी कोरोना विषाणूची लस तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जर इस्राईलने खरोखर अशी कोरोना लस आणण्याची घोषणा केली, तर रुग्णांसाठी ती वापरण्याआधी तिच्या अनेक चाचण्या घ्याव्या लागतील. मानवांवर उपयोग करण्यापूर्वी त्याचा उपयोग प्राण्यांवर केला जाईल आणि त्याचे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम पहिले जातील.