MEA Spokesperson Arindam Bagchi (PC -ANI)

Ukraine-Russia War: भारताने युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात कोणतीही बाजू घेतली नाही. परंतु, तरी मानवतावादी आधारावर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (MEA Spokesperson Arindam Bagchi) यांनी सोमवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आम्ही औषधांसह (Medicines) मानवतावादी मदत युक्रेनला पाठवू. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही ऑपरेशन गंगा मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 6 विमानांद्वारे 1,400 लोकांना भारतात आणण्यात आले आहे. यातील चार विमाने रोमानियातील बुखारेस्ट येथून आली आहेत, तर दोन विमाने हंगेरीतील बुडापेस्ट येथून भारतात आली आहेत.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे की, लोकांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. ज्यामुळे चिंता वाढत आहे. आम्ही आमचे कार्य अधिक तीव्र केले आहे आणि आमचे लक्ष शक्य तितक्या लवकर लोकांना बाहेर काढण्यावर आहे. (वाचा - Ukraine-Russia War: रशियासोबतच्या युद्धात NATO चा प्रवेश; युक्रेनला पुरवणार Missiles आणि Anti-Tank Weapons)

केंद्र सरकारने सांगितले आहे की, अॅडव्हायझरी जारी झाल्यापासून आतापर्यंत 8,000 भारतीयांनी युक्रेन सोडले आहे. एकीकडे मोदी सरकारने हरदीप सिंग पुरी, व्हीके सिंग, किरेन रिजिजू आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेनमधून दिल्लीला परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. आमचे कुटुंबीय काळजीत होते, पण आम्हाला सुखरूप बाहेर काढल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थ्याने सांगितले की, अजूनही मोठ्या प्रमाणात लोक युद्धक्षेत्रात अडकले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्योतिरादित्य सिंधिया रोमानियाला जात आहेत, तर किरेन रिजिजू यांना स्लोव्हाकियाला पाठवले जात आहे. याशिवाय हरदीप सिंग पुरी यांना हंगेरी आणि व्हीके सिंग यांना पोलंडला पाठवले जात आहे. हे सर्व मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पोहोचून भारतीय लोकांच्या परतीसाठी मदत करतील.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने मोल्दोव्हा येथूनही मार्ग शोधला आहे. याद्वारे लोकांना भारतात आणले जाईल. ज्योतिरादित्य सिंधिया मोल्दोव्हामधून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करतील. भारतातील विद्यार्थ्यांना आणि इतरांना पश्चिम युक्रेनमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्यांनी थेट सीमेवरून जाऊ नये, असा सल्ला सरकारने दिला आहे. तिथून बाहेर पडायला वेळ लागेल. त्यामुळे नजीकच्या शहरांमध्ये जाऊन तेथे थोडा वेळ घालवण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.