Ukraine-Russia War, NATO (PC - pixabay, Twitter)

Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात (Ukraine-Russia War) नाटो (NATO) आता अधिकृतपणे एक पक्ष बनला आहे. नाटो संघटनेचे म्हणणे आहे की, ते युक्रेनला हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि Anti-Tank Weapons पुरवतील. नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली. याबाबत आपण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लवकरचं युक्रेनला हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि Anti-Tank Weapons शस्त्रे देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

याशिवाय नाटो प्रमुखांनी इतर देशांच्या नेत्यांशीही संवाद साधला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिथुआनियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे. ज्यात त्यांनी रशियन हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, नाटोने बाल्टिक देशांमध्ये आपली शक्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाला खडतर आव्हान देताना ते म्हणाले की, आम्ही आमचे मित्र राष्ट्र आणि त्यांच्या भूमीचे संरक्षण करू.  (वाचा - Russia Ukraine Crisis: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष यांचे आव्हान)

दरम्यान, नाटो देशांची एकजूट आणि युक्रेनला मदत करण्याच्या घोषणेदरम्यान रशियाने अण्वस्त्र सराव सुरू केला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांचा इशारा दिला आहे, असे रशियन माध्यमांचे म्हणणे आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पलायन केले आहे. एएफपीने संयुक्त राष्ट्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात रशियाच्या आक्रमणानंतर अर्धा दशलक्षाहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रिफ्यूजी अफेयर्स (UNHCR) चे प्रमुख फिलिपो ग्रांडी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

याशिवाय यूएनएचसीआरच्या प्रवक्त्या शाबिया मंटू यांनी सांगितले की, पोलंडमध्ये 281,000 लोक, हंगेरीमध्ये 84,500, मोल्दोव्हामध्ये सुमारे 36,400, रोमानियामध्ये 32,500 हून अधिक आणि स्लोव्हाकियामध्ये सुमारे 30,000 लोक प्रवेश करत आहेत.