
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सैन्य तणावावर (India-Pakistan Conflict) चिंता व्यक्त करत, दोन्ही देशांना ‘प्रत्युत्तराची कारवाई’ थांबवण्याचे आवाहन केले. भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 7 मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. या कारवाईनंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल नियंत्रण रेषेवर (LoC) हल्ले केले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. ट्रम्प यांनी या परिस्थितीला ‘अत्यंत भयानक’ संबोधत दोन्ही देशांनी तात्काळ शांतता प्रस्थापित करावी आणि चर्चेद्वारे मार्ग काढावा, असे सुचवले. त्यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवत ‘मी काही मदत करू शकलो, तर मी करेन’, असे सांगितले.
ट्रम्प यांची भूमिका आणि मध्यस्थीची ऑफर-
वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘माझी भूमिका आहे की मी दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवतो. मी दोन्ही देशांना चांगले ओळखतो आणि त्यांनी हा प्रश्न सोडवावा अशी माझी इच्छा आहे. त्यांनी आता थांबावे. त्यांनी प्रत्युत्तराची कारवाई केली आहे, आता ती थांबली पाहिजे,’ असे ट्रम्प यांनी सांगितले. त्यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल बोलताना म्हटले की, त्यांना या कारवाईची माहिती ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश करतानाच मिळाली. ‘हा तणाव खूप काळापासून आहे. मी आशा करतो की हे लवकर थांबेल,’ असे त्यांनी नमूद केले.
Donald Trump on India-Pakistan Conflict:
VIDEO | Washington DC: US President Donald Trump (@POTUS) on tensions between India and Pakistan following Operation Sindoor says, “My position is that I get along with both countries. I know both very well, and I want to see them work things out. I want to see the conflict… pic.twitter.com/liZP4jz21o
— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2025
ट्रम्प यांनी यापूर्वीही पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगत मध्यस्थीची तयारी दर्शवली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली, ज्यामध्ये त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा: Pakistan Ceasefire Violation: पूंछ आणि तंगधार परसरात पाकिस्ताकडून गोळीबार; 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी, भारताकडून चोख प्रत्युत्तर)
ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक तणाव-
भारताने 7 मे रोजी पहाटे राफेल लढाऊ विमानांद्वारे SCALP क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानातील बहावलपूर, मुरीदके, आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली यासह नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारतीय संरक्षण मंत्रालयाने ही कारवाई ‘अचूक आणि संयमित’ असल्याचे सांगितले, आणि पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य न केल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्यांचे उद्दिष्ट जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करणे होते, ज्यांना 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथील हल्ल्यासाठी जबाबदार धरले गेले. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता.