भारत, चीन, पाकिस्तान (प्रातिनिधिक आणि संग्रहित प्रतिमा)

भारताचे शेजारी चीन आणि पाकिस्तान हे उभय देशांमध्ये बससेवा सुरु करत आहेत. उभय देश अशा पद्धतीची सेवा सुरु करतील अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासूनच व्यक्त केली जात होती. पण, आता त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. त्यामुळे चीन-पाकिस्तान हे दोन्ही देश लवकरच रस्तेमार्गे एकमेकांच्या सीमांमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, वरवर पाहता दोन्ही देशांमध्ये दळणवळण व्यवस्था सुरु करण्याचा हा केवळ बहाणा असला तरी, भारताविरुद्ध एक ताकद उभा करणे हाच या दोन्ही देशांचा त्यामागचा उद्देश असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांनी दिला आहे. हा इशारा गांभीर्याने घेत भारतानेही उभय देशांच्या या प्रयत्नाला जोरदार विरोध दर्शवला आहे. ही बस काश्मीरमधून पाकिस्तानात जाणार असल्याचे समजते.

चीन-पाक यांच्यातील ही बससेवा 'चायना पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडॉर'च्याअंतर्गत सुरु होणार आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, ही बस सेवा एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे चालवण्यात येईल. येत्या १३ नोव्हेंबरला ही बससेवा अधिकृतपणे सुरु होण्याची शक्यता असून, पाकिस्तानातील लाहोर येथून चीनच्या काशगर प्रांतापर्यंत ही बस प्रवास करणार आहे. एकूण ३० तासांच्या या प्रवासासाठी पाकिस्तानातून चीनला जाण्यासाठी येणारा खर्च १३ हजार पाकिस्तानी रुपये इतका असेल. तर, परतीच्या प्रवासासाठी हाच खर्च २३ हजार पाकिस्तानी रुपये इतका असेल. बससेवा सुरु होण्यापूर्वीच अनेक लोकांनी या बसप्रवासासाठी अडव्हान्स बुकींक केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पाकिस्तान-चीनच्या या संभाव्य बससेवेस भारताने विरोध दर्शवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून या बसचा मार्ग जात असल्यामुळे भारताने आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी या संदर्भात भारताने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडे बससेवेबद्दल विरोध दर्शवल्याचे म्हटले आहे. रविश कुमार म्हणाले, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरच्या माध्यमातून चीन-पाकिस्तानच्या बससेवेला भारताने विरोध दर्शवला आहे. (हेही वाचा, बॉलिवूड आणि भारतीय हिंदी मालिकांवर पाकिस्तानमध्ये बंदी)

रविश कुमार यांनी पुढे म्हटले आहे की, भारत सरकारने चीन आणि पाकिस्तानला सीमा करारास (बाउंड्री एग्रिमेंट) मान्यता दिली नाही. १९६२मध्ये चीनने भारताच्या भूभागावर अवैध पद्धतीने ताबा मिळवला आहे. तर, पाकिस्तानने १९४८पासून काश्मीरच्या एक तृतिांश भागावर अवैधपने नियंत्रण मिळवले आहे. पण, भारत हे ठामपणे सांगू इच्छितो की, त्या सर्व भूभागावर भारताचा हक्क आहे. आणि तो भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्या परिसरातून भारताला न विचारता कोणत्याही पद्धतीने चालवली जाणारी बससेवा हा भारताच्या भूसीमेचे उल्लंघन आहे.