Kulbhushan Jadhav Case (Photo Credits: ANI)

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav)  यांच्यावर हेरगिरी व दहशतवादी  कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. यावर भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेऊन हा निर्णय मागे घेत जाधव यांची सुटका करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी आज, 17 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (International Court Of Justice) अंतिम निकाल लागणार आहे. या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदे विषयक टीम हेग येथे पोहचली आहे, भारतीय प्रमाण वेळेनुसार हा खटला संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सुरु होईल. हेग (Hague) येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याविषयी निकाल देणार आहेत.

कुलभूषण जाधव प्रकरणी हरीश साळवे यांनी भारताची बाजू कोर्टात मांडली होती, तर पाकच्या कायदे विषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील अनवर मंसूर खान यांनी केले आहे. तूर्तास, जाधव हे पाकिस्तान मध्ये जेलबंद आहेत. Kulbhushan Jadhav Case: ICJ कोर्टात पाकिस्तानचे भारतावर खोटे आरोप; कुलभूषण जाधव दोषी असल्याचा दावा)

पाकिस्तानच्या दाव्यानुसार, जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. तर या प्रकरणी भारताची बाजू मांडताना, साळवे यांनी पाकिस्तानकडे कुलभूषण यांच्यावर जबरदस्ती करत घेतलेल्या जबाबाशिवाय काहीच पुरावा नसल्याचे म्हंटले होते. जाधव यांनी निवृत्ती घेतली असून ते व्यापारासाठी इराणला होते, या ठिकाणाहून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. व त्यानंतर जाधव यांना भारतीय हेर म्हणून सिद्ध करण्याचा बनाव केला अशी माहिती भारतातर्फे मांडण्यात आली होती.

दरम्यान, डिसेंबर 2017, मध्ये पाकिस्तानने कुलभूषण यांना त्यांचं आई व पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती, मात्र यावेळेस सुद्धा त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती, तसेच मधील काळात, जाधव यांचा भारतीय राजदूतावासाशी संपर्क होऊ न देणे, खोट्या पुराव्यांवर खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावणे अशी कृत्ये करून पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, त्यामुळे आजच्या खटल्यात कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.