मनुष्याचे आयुष्य (Human Lifespan), त्याची वयोमर्यादा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जात आहेत. सामान्यत: असे मानले जाते की एक माणूस सरासरी 80 वर्षांपर्यंत जगू शकतो. आता याबाबत इस्त्रायली (Israel) शास्त्रज्ञांनी एक मोठे यश संपादन केले आहे. इस्रायलमधील वैज्ञानिकांनी उंदरांचे आयुष्यमान 23 टक्क्यांनी वाढवले आहे. हे संशोधन जर का मनुष्यावर लागू केले तर मानवांचे सरासरी आयुर्मान 120 वर्षे होण्याची आशा निर्माण झाली आहे. संशोधनादरम्यान, वैज्ञानिकांनी एसआयआरटी 6 (SIRT6) नामक प्रोटीनचा पुरवठा वाढवून 250 उंदीरांच्या आयुर्मानात 23 टक्के वाढ केली.
टाइम्स ऑफ इस्त्राईलच्या अहवालानुसार वैज्ञानिकांनी 250 उंदीरांमध्ये एसआयआरटी 6 प्रथिनांचा सप्लाय वाढवला. एसआयआरटी 6 प्रथिने वयानुसार घटत असते. मात्र हे प्रथिने वाढवल्यावर उंदरांचे आयुर्मान वाढल्याचे समोर आले. हे उंदीर अधिक तरुण झाल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले. यासह उंदरांमध्ये कर्करोग होण्याची शक्यताही कमी झाली. हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा अभ्यास मानवांचे आयुष्यमान वाढवण्याचा एक मोठा मार्ग तयार करू शकतो.
आयुष्यमान बदलणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बार-इलन विद्यापीठाचे प्राध्यापक हैम कोहेन यांनी टाइम्स ऑफ इस्त्राईलला सांगितले. ते म्हणाले की, उंदरांमध्ये एसआयआरटी 6 प्रोटीनमुळे केलेले बदल मानवांमध्येही करता येतील. प्रोफेसर कोहेन म्हणाले की, या शोधातून असे दिसून येते की एसआयआरटी 6 वृद्धत्वाचे प्रमाण नियंत्रित करते. येत्या दोन ते तीन वर्षांत अशा प्रकारे मानवाचे आयुर्मानही वाढू शकते. (हेही वाचा: जगात पहिल्यांदाच मानवामध्ये आढळला बर्ड फ्लूचा H10N3 स्ट्रेन; जाणून घ्या किती धोकादायक आहे)
प्रोफेसर कोहेन यांनी 2012 मध्ये एक असाच प्रयोग केला होता. त्या काळात त्यांनी उंदरांमधील प्रथिने पातळीत केवळ 15 टक्क्यांनी वाढ केली होती. कोहेन यांनी आता लेटेस्ट संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांसोबत काम केले. यात अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) चे प्रोफेसर राफेल डी काबो देखील समाविष्ट आहेत. या संशोधनादरम्यान, नर उंदीरांचे आयुष्य 30 टक्के आणि मादा उंदरांचे आयुष्य सुमारे 15 टक्क्यांनी वाढले. शास्त्रज्ञांना आढळले की, वय वाढत असलेल्या उंदरांनी एसआयआरटी 6 जास्त प्रमाणात तयार केले, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली आणि कर्करोगाचा धोका कमी झाला.