सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणू (Coronavirus) आपत्तीशी दोन हात करत आहे. लसीकरणानंतर या विषाणूचा धोका काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे, मात्र आता एका दुसऱ्याच आजारामुळे चिंता वाढली आहे. चीनच्या पूर्व प्रांतीय जिआंग्सुमध्ये (Jiangsu) एक मनुष्य बर्ड फ्लूच्या (Bird Flu) H10N3 स्ट्रेनने संक्रमित झाल्याची घटना आढळली आहे. मानवामध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) मंगळवारी ही माहिती दिली. शासकीय सीजीएनटी टीव्हीने सांगितले की, झेनजियांग (Zhenjiang) शहरातील या 41 वर्षीय रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला रुग्णालयातून सोडण्यात येऊ शकते.
कुक्कुटपालनामुळे हा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. एनएचसीने आश्वासन दिले आहे की मोठ्या प्रमाणात या संसर्गाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यात असेही म्हटले आहे की, जगात अद्यापपर्यंत एच 10 एन 3 बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाची नोंद झालेली नाही. बर्ड फ्लूच्या एच 10 एन 3 स्ट्रेनमुळे पीडित व्यक्तीस ताप आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांमुळे 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले गेले होते. संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली, परंतु त्यांच्यात असे काही आढळले नाही.
चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) गेल्या आठवड्यात रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यावर जीनोम सीक्वेन्स केला आणि हा एच 10 एन 3 बर्ड फ्लूचा स्ट्रेन असल्याची पुष्टी केली. तज्ञांनी सल्ला दिला आहे की, या भागातील लोकांनी आजारी किंवा मृत कोंबड्यांच्या किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येण्याचे टाळले पाहिजे. तसेच, लोकांनी पक्ष्यांशी थेट संपर्कही ठेऊ नये. एनएचसीने सल्ला दिला की, लोकांनी अन्न स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करावे, मास्क घालावे आणि ताप व श्वसनाची संबंधित लक्षणांची ताबडतोब तपासणी करावी. (हेही वाचा: China मध्ये आता तीन मुलांना जन्म देण्यास नागरिकांना परवानगी, 'या' कारणामुळे जिनपिंग सरकारने बदलले नियम)
दरम्यान, लियानयुंगच्या गर्दीच्या ठिकाणी जंगली पक्ष्यांमध्ये अत्यंत धोकादायक अशा एव्हीयन इन्फ्लूएंझा आढळला आहे. सिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की, H5N8 हा 'इन्फ्लूएन्झा ए व्हायरस' (ज्याला बर्ड फ्लू विषाणू देखील म्हणतात) चा उपप्रकार आहे. एच 5 एन 8 हा मानवासाठी कमी धोकादायक आहे, परंतु वन्य पक्षी आणि कोंबड्यांसाठी तो अत्यंत घातक आहे.