Donald Trump| Wikimedia Commons

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या 'मेक इन इंडिया' योजनेला मोठा धक्का देण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांच्या नव्या निर्णयानुसार, ॲपल (Apple) कंपनीचे फोन भारतासह इतर कोणत्याही देशात बनवले गेले असतील तर, त्यावर अमेरिकेत 25% कर लादला जाईल. म्हणजेच अमेरिकेबाहेर तयार होणारे आयफोन (iPhone) अमेरिकेमध्ये महाग होणार आहेत. ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कूक यांना यापूर्वीच सांगितले आहे की, अमेरिकेत विक्री होणारे आयफोन अमेरिकेतच बनवले जावेत. आता ट्रंप यांच्या या घोषणेमुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन विस्तार योजनेवर परिणाम होऊ शकतो, जिथे कंपनी आपले 25% जागतिक आयफोन उत्पादन पुढील काही वर्षांत स्थानांतरित करण्याच्या तयारीत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मंचावर एका पोस्टद्वारे ॲपलला इशारा दिला. त्यांनी लिहिले की, त्यांनी टिम कूक यांना यापूर्वीच सांगितले आहे की, अमेरिकेत विक्री होणारे आयफोन अमेरिकेतच बनवले जावेत, भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नव्हे. जर ॲपलने याचे पालन केले नाही, तर त्यांना अमेरिकेत 25% कर भरावा लागेल. या घोषणेनंतर ॲपलच्या शेअर्समध्ये प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये 4% घसरण झाली, ज्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरले.

ट्रम्प यांनी यापूर्वी 15 मे 2025 रोजी दोहा, कतार येथील एका व्यावसायिक परिषदेत टिम कूक यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले, ‘मी टिमला सांगितले, आम्ही तुम्हाला खूप चांगली वागणूक दिली, तुम्ही चीनमध्ये बांधलेल्या सर्व कारखान्यांना आम्ही वर्षानुवर्षे सहन केले, आता तुम्ही आमच्यासाठी उत्पादन करावे. आम्हाला तुम्ही भारतात कारखाने बांधावेत असे वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.’ ट्रम्प यांनी ॲपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवेल, असेही दावा केला, परंतु त्यांनी याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

ॲपलने गेल्या काही वर्षांत भारताला आपल्या जागतिक उत्पादन केंद्राचे महत्त्वाचे ठिकाण बनवले आहे. सध्या कंपनी आपले सुमारे 15% आयफोन भारतात बनवते, आणि 2026 पर्यंत हे प्रमाण 25% पर्यंत वाढवण्याची योजना आहे. ॲपलचे प्रमुख असेंब्ली भागीदार फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चेन्नईतील फॉक्सकॉनचा कारखाना गेल्या वर्षी 20 दशलक्ष आयफोन बनवला, ज्यामध्ये आयफोन 15 आणि 16 मॉडेल्सचा समावेश आहे.

अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव आणि कोविड-19 मुळे उद्भवलेल्या पुरवठा साखळीतील अडचणींमुळे ॲपलने आपले 90% आयफोन उत्पादन चीनमधून इतर देशांमध्ये हलवण्यास सुरुवात केली. भारताच्या 'मेक इन इंडिया' आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेंतर्गत ॲपलच्या भागीदारांना 2022-25 दरम्यान सुमारे 6,600 कोटी रुपये अनुदान मिळाले. यामुळे भारतात आयफोन आणि ॲअरपॉड्सचे उत्पादन वाढले. ॲपलने मार्च 2025 मध्ये भारतातून सुमारे 2 अब्ज डॉलर किमतीचे आयफोन अमेरिकेत निर्यात केले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. (हेही वाचा: Tech Layoffs 2025: टेक क्षेत्रात 2025 मध्ये 61,000 हून अधिक नोकर कपात; Microsoft, IBM, Google, Amazon सह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ॲपलसाठी अमेरिकेत आयफोन बनवणे अव्यवहार्य आहे, कारण तिथे पुरेशी कुशल मनुष्यबळ आणि पुरवठा साखळी नाही. बँक ऑफ अमेरिकेच्या विश्लेषकांचा अंदाज आहे की, अमेरिकेत उत्पादन केल्यास आयफोनची किंमत 25% वाढू शकते, ज्यामुळे आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत 1,599 डॉलरवरून 2,300 डॉलर होऊ शकते. यामुळे ॲपलच्या नफ्यावर आणि बाजारातील मागणीवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, ॲपलचे भारतातील उत्पादन 'मेक इन इंडिया' योजनेचे यश आहे. जर ॲपलने भारतातील गुंतवणूक कमी केली, तर स्थानिक रोजगार आणि निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ॲपलच्या अधिकाऱ्यांनी भारतीय सरकारला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या भारतातील गुंतवणूक योजनांमध्ये कोणताही बदल होणार नाही.