
Human Rights Day: आजचा संपूर्ण जगभरात ‘मानवाधिकार दिन’ (Human Rights Day) साजरा केला जात आहे. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना झाली. त्यानंतर मानवी हक्कासाठी आणि मानवाच्या प्रगतीसाठी काम सुरू झाले. सर्वांना शांततामय आणि प्रगतिशील जीवन जगता यावे यासाठी 1948 मध्ये 58 देशांनी मानवी अधिकाराच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवाधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये 10 डिसेंबर 1948 रोजी ‘मानव अधिकारांची सार्वभौम घोषणा’ करण्यात आली. या जाहीरनाम्यात एकूण 30 अनुच्छेद आहेत. यात प्रत्येक मानवाला काही हक्क देण्यात आले आहेत. अनेकांना या हक्काबद्दल माहिती नसते. त्यामुळे आपण आज या लेखामधून मानवी हक्काविषयींची कलमे जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - Human Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात !)
प्रत्येक मानवाला आहेत 'हे' 30 मानवाधिकार -
- कलम 1 - सर्व मानवजात जन्मतः स्वतंत्र आणि व्यक्ती प्रतिष्ठा व हक्काच्या बाबतीत समान आहे. सर्वांना वैचारिक शक्ति व सदसाविवेक बुद्धीची देणगी लाभली असून सर्वांना परस्परांशी बंधुत्वाच्या भावनेने व्यवहार केले पाहिजेत.
- कलम 2 - प्रस्तुत जाहीरनाम्यात नमूद सर्व हक्क व स्वातंत्र्ये प्रत्येकाला उपलब्ध असतील. कोणालाही वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म राजकीय अथवा इतर मत; राष्ट्रीय व सामाजिक मूळ, दारिद्रय, जन्म वा इतर स्थान या आधारे भेदभाव केला जाणार नाही.
- कलम 3 - प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा अधिकार आहे.
कलम 4 - कोणत्याही व्यक्तीला गुलामगिरीत ठेवता येणार नाही. सर्व प्रकारची गुलामगिरी आणि गुलामांचा व्यापार यास प्रतिबंध घातला जाईल.
- कलम 5 - कोणत्याही व्यक्तीचा छळ केला जावू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीला क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वर्तणूक अथवा शिक्षा दिली जावू नये.
- कलम 6 - प्रत्येकाला कायद्यासमोर व्यक्ती म्हणून सर्वत्र मान्यता प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
- कलम 7 - सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. तसेच कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.
- कलम 8 - संविधान अथवा कायद्याने प्रधान केलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय लवादाकडे प्रभावी दाद मागण्याचा अधिकार आहे.
- कलम 9 - कोणत्याही व्यक्तीस मनमानी अटक अथवा बेकायदेशीररीत्या स्थानबद्ध करता येणार नाही किंवा हद्दपार करता येणार नाही.
- कलम 10 - प्रत्येक व्यक्तीला आपले हक्क व जबाबदार्या निर्धारित करणे आणि स्वत: वरील गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपाबाबद सर्वांना स्वतंत्र व नि: पक्षपाती लवादामार्फत न्याय्य आणि खुल्या सुनावणीचा अधिकार आहे.
- कलम 11 - गुन्ह्याचे आरोपी असणारी व्यक्ती जोपर्यंत सुनावणी होऊन न्यायालयाव्दारे दोषी ठरवल्या जात नाही. तोपर्यंत तिला निर्दोष मानले पाहिजे आणि न्यायालयी प्रक्रियेत आपली बाजू मांडण्याचा तिला अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने केलेले कृत्य प्रचलित राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुन्हेगारी मानले जावे. तसेच एखादे कृत्य केले तेव्हा प्रचलित कायद्यात जी शिक्षा नमूद केलेली असते त्यापेक्षा अधिक शिक्षा देता कामा नये.
- कलम 12 - कोणत्याही व्यक्तीची खाजगी, कौटुंबिक आयुष्य अथवा पत्रव्यवहार यात मनमानी हस्तक्षेप करता येणार नाही. किंवा त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठा यावर अतिक्रमण करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला अशा हस्तक्षेपापासून कायदेशीर संरक्षण मागण्याचा अधिकार असेल.
- कलम 13 - प्रत्येक व्यक्तीला आपल्या राष्ट्रांअतर्गत कोणत्याही भागात संचार करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या राष्ट्रासह कोणतेही राष्ट्र सोडून जाण्याचा आणि राष्ट्रात परत येण्याचा हक्क आहे.
- कलम 14 - छळापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला देशात राजाश्रय घेण्याचा आणि तेथे वास्तव्य करण्याचा अधिकार आहे.
- कलम 15 - प्रत्येकाला राष्ट्रीयत्वाचा अधिकार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीयत्व बेकायदेशीररीत्या रद्द करता येणार नाही. किंवा राष्ट्रीयत्व बदलण्याचा व्यक्तीचा हक्क नाकारला जाणार नाही.
- कलम 16 - स्त्री व पुरूषांना वंश, राष्ट्रीयत्व अथवा धर्म याआधारे कोणताही भेदभाव न करता विवाह करून स्वत:चे कुटुंब स्थापन करण्याचा अधिकार आहे.
- कलम 17 - प्रत्येकाला व्यक्तीगत व सामुहिकरीत्या मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता बेकायदेशीररीत्या हिरावून घेता येणार नाही.
- कलम 18 - प्रत्येक व्यक्तीला विचार, विवेक आणि धार्मिक स्वातंत्र्य असेल. यात स्वतःचा धर्म वा संप्रदाय बदलण्याचा अधिकार तसेच व्यक्तीगत वा इतरांच्या साहाय्याने आणि सार्वजनिक वा खाजगीरीत्या शिकवणूक, आचरण व उपासनेव्दारा धर्माचा आविष्कार करण्याचा अधिकार आहे.
- कलम 19 - प्रत्येकाला मत स्वातंत्र व अविष्काराचे स्वातंत्र्य आहे.
- कलम 20 - प्रत्येकाला शांततामय मार्गाने सभा भरविण्याचा आणि संघटना बांधण्याचा अधिकार आहे.
- कलम 21 - प्रत्येकाला अप्रत्येक्षपणे अथवा खुल्या पद्धतीने निवडलेल्या प्रतिनिधीव्दारे शासन कारभारात सहभागी होता येईल.
- कलम 22 - समाजाचा सदस्य म्हणून प्रत्येकाला सामाजिक सुरक्षेचा हक्क आहे. आपली व्यक्तीगत प्रतिष्ठा तसेच व्यक्तिमत्वाचा मुक्त विकासासाठी राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रत्येक देशाचे संघटन व संसाधनांच्या प्रमाणात आपले आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक हक्क प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
- कलम 23 - प्रत्येक व्यक्तिला कामाचा, आपल्या इच्छेनूरूप रोजगार निवडीचा, कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल परिस्थिति असण्याचा आणि बेकारीपासून संरक्षणाचा हक्क आहे.
- कलम 24 - प्रत्येकाला विश्रांती आणि विरंगुळ्याचा अधिकार आहे. यात कामाचे निश्चित व मर्यादित तास आणि नियमित पगारी सुट्टीचा समावेश होतो.
- कलम 25 - प्रत्येकाला स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य व कल्याण साधण्यासाठी आवश्यक जीवनमान राखण्याचा अधिकार आहे.
- कलम 26 - प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. किमान प्राथमिक आणि मूलभूत स्थरावरील शिक्षण मोफत असेल. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे.
- कलम 27 – प्रत्येकाला आपल्या समुदयाच्या सांस्कृतिक जीवनात मुक्तपणे सहभाग घेणे, कलांचा आस्वाद घेणे आणि वैज्ञानिक प्रगतीचा लाभ घेण्याचा हक्क आहे.
- कलम 28 - प्रस्तुत जाहीरनाम्यात नमूद केलेल्या सर्व हक्क व स्वातंत्र्याची पूर्तता होईल, अशा सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा प्रत्येक व्यक्तिला हक्क आहे.
अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला वरील मानव अधिकार आहेत. तसेच कलम 29 मध्ये प्रत्येक व्यक्तिला आपल्या समाजाप्रती काही कर्तव्य पार पाडण्यास सांगण्यात आले आहेत. व्यक्तिला आपले हक्क व स्वातंत्र्य संयुक्त राष्ट्रसंघटनेची उद्दिष्टे व तत्वे यास विसंगत ठरतील, अशा प्रकारे उपभोगता येणार नाही. तसेच कलम 30 नुसार, प्रस्तुत जाहीरनाम्यातील कोणत्याही राष्ट्रात, गटास किंवा व्यक्तीस या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या हक्क वा स्वातंत्र्यास बाधा आणणारी कृती करता येणार नाही.