कोरोना विषाणूशी (Coronavirus) झुंज देत असलेल्या संपूर्ण जगासाठी एक चांगली बातमी आहे. ब्राझील (Brazil) मध्ये झालेल्या संशोधनात डेंग्यू (Dengue) चा प्रसार आणि कोरोना विषाणू यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. या संशोधनात असे दिसून आले आहे की, डेंग्यू ताप हा कोरोना विषाणूच्या साथीच्या विरूद्ध ‘संरक्षण कवच’ बनत आहे. डेंग्यू हा ताप लोकांना काही प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती (Immunity) देत आहे, ज्यामुळे कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत होत आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर मिगुएल निकोलिस (Miguel Nicolelis) यांनी ही माहिती दिली आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना त्यांनी वर्ष 2019 आणि 2020 मध्ये डेंग्यू तापाने झालेल्या भौगोलिक प्रसाराची कोरोनाशी तुलनात्मक आकृती सादर केली. यामध्ये म्हटले आहे की, ज्या ठिकाणी कोरोनाचा फार कमी संसर्ग झाला आहे किंवा ज्या ठिकाणी कोरोना वाढण्याचे प्रमाण कमी आहे, तिथे यापूर्वी डेंग्यूची मोठी साथ येऊन गेली आहे.
ब्राझीलमधील अभ्यासानुसार असे म्हटले आहे, 'ही विलक्षण माहिती डेंग्यू विषाणूच्या अँटीबॉडीज आणि कोरोना व्हायरस यांच्यातील असणाऱ्या गुप्त संबंधाबाबत शक्यता दर्शवते. जर हे सत्य सिद्ध झाले तर, डेंग्यूच्या निर्मूलनासाठी बनवलेली प्रभावी आणि सुरक्षित लस ही कोरोना विषाणूपासून काही प्रमाणात संरक्षण देखील देऊ शकते. डेंग्यू आणि कोरोना विषाणूमधील हे संबंध लॅटिन अमेरिकेच्या इतर भागात तसेच आशिया आणि पॅसिफिक महासागरातील देशांमध्ये आढळून आले आहेत, असे या संशोधन पथकाला आढळले आहे.
प्राध्यापक पुढे म्हणतात, ‘हे रिझल्ट्स अतिशय रंजक आहेत, कारण पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, ज्या लोकांच्या रक्तात डेंग्यू Antibodies आहेत असे लोक कोरोना विषाणूच्या संपर्कात न येताही सकारात्मक आढळले आहेत.’ निकोलस म्हणाले की, ‘हा एक संकेत आहे की दोन विषाणूंमधील रोग प्रतिकारशक्तीशी संबंधित संबंध आहे ज्याची कोणालाही अपेक्षा नाही.’ (हेही वाचा: कोरोना मुळे आर्थिक अडचणीत वाढ, 10 पैकी 1 विद्यार्थी करतोय सेक्स वर्कर बनण्याचा विचार- Survey)
हे संशोधन लवकरच वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये सांगितले जाईल की, ब्राझीलमधील डेंग्यूने ग्रस्त काही भागांमध्ये इतर प्रदेशांच्या तुलनेत कमी कोरोना विषाणू संसर्ग व मृत्यू आहेत. ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूची 44 लाख प्रकरणे झाली आहेत.