जवळजवळ एक वर्षे कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढल्यानंतर आता कोरोनाच्या लसीमुळे (Coronavirus Vaccine) या आजारावर मात करण्याची आशा निर्माण झाली आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणानंतरही कोरोना विषाणूचा सतत प्रसार होण्याच्या धोक्याचा इशारा दिला आहे. म्हणजेच कोरोना लसीकरणानंतरही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो किंवा कोरोनाची लस तुम्हाला 100 टक्के या विषाणूपासून वाचवू शकणार नाही, असे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.
डब्ल्यूएचओ इमर्जन्सी हेल्थ प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रायन यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा असा विश्वास आहे की जगात कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी किंवा या विषाणूच्या उच्चाटनासाठी लसीकरणाकडे एक ठोस उपाय म्हणून पहिले जाऊ शकत नाही. रायन म्हणाले की, 'लसीकरण हे कोरोना विषाणूवर यश मिळवल्याचा मापदंड नाही. लसीकरणाचे यश म्हणजे, हा विषाणू नष्ट करण्याची क्षमता कमी करणे, लोकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होते आणि आपले आर्थिक आणि सामाजिक जीवन सुधारण्यास मदत मिळणे हे आहे.
लसीकरणामुळे आपण या विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकणार नाही, त्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे देशांनी 2021 पर्यंत या व्हायरसपासून मुक्त होण्याची अपेक्षा करू नये. ते पुढे म्हणाले की, मानवी इतिहासामध्ये या ग्रहावर आत्तापर्यंत आम्ही फक्त एक रोग दूर केला आहे, तो म्हणजे स्मॉलपॉक्स. त्यामुळे आता आपल्याला कोरोना व्हायरस नियंत्रित करता येईल अशा ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Coronavirus Vaccination Rumours: कोरोना व्हायरस लसीबाबत अफवा किंवा खोटी माहिती पसरवल्यास होणार कारवाई; केंद्राचे राज्यांना आदेश)
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हॅक्स उपक्रमाला हळूहळू लस पुरवठा होणार असून करारानुसार टप्प्याटप्प्याने विविध देशांना लसी पुरवल्या जातील, अशी माहिती भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाला दिली आहे. नवी दिल्लीने 'लस डिप्लोमसी'च्या माध्यमातून नऊ देशांना 6 दशलक्षांपेक्षा जास्त लसीचे डोस पाठविले आहेत.