Coronavirus Vaccination Rumours: कोरोना व्हायरस लसीबाबत अफवा किंवा खोटी माहिती पसरवल्यास होणार कारवाई; केंद्राचे राज्यांना आदेश
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीला आळा घालण्यासाठी देशभर लसीकरण (Vaccination) सुरू झाले आहे. अशात या लसीबाबत अनेक चुकीच्या अफवा (Rumours), खोटी माहिती (Fake News) पसरवली जात आहे. आता केंद्र सरकारने देशी लसीबाबत अफवा पसरविण्याविषयी इशारा दिला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांना सांगण्यात आले आहे की आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार जे लोक अफवा पसरवत आहेत किंवा कोरोना लसीकरणाच्या अफवांमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी.

राष्ट्रीय कोरोना व्हायरस लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. सध्या 'भारत बायोटेक'ची कोव्हॅक्सिन आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका व ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड या दोन लसी दिल्या जात आहेत. भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल व्ही.जी. सोमाणी यांनी दोन्ही लसांना '110 टक्के सुरक्षित' घोषित केले आहे. श्री. सोमानी म्हणाले की कोव्हिशिल्ड 70.42 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे, तर कोव्हॅक्सिन 'सुरक्षित आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते.'

आता गृहसचिवांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे की, अफवा आणि खोटी बातमी थांबविण्यासाठी अशा बातम्या पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. यासह, वास्तविक तथ्यांच्या आधारे विश्वसनीय माहिती प्रसारित करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. अफवा पसरविणार्‍या संस्था आणि कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. (हेही वाचा: पाकिस्तान कडून रशियाची कोरोनावरील Sputnik लसीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी)

कोरोना लसीकरण कार्यक्रम देशभर सुरू झाला आहे. लसीकरणानंतर सोशल मीडियावर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही. या अफवांमध्ये लोकांना लस घेऊन नका असे सांगितले आहे. तसेच या लसी जीवघेण्या असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले की भारतीय वैज्ञानिकांनी कोविड-19 ची लस विकसित करून आपले कर्तव्य पार पाडले आहे आणि आता आपल्याला खोटी माहिती आणि अफवा पसरविणाऱ्या प्रत्येकाला योग्य माहितीच्या सहाय्याने पराभूत करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.