WHO (Photo credit: archived, edited, symbolic images)

चीन पाठोपाठ आता सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या भारत देशामध्ये कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट बसायला सुरूवात झाली आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 450 च्या पार गेली आहे. अशामध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या भारत देशामध्ये आता 'कोरोना' चा कसा सामना केला जातो याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील भारताकडून 'करोना'चा सक्षमपणे सामना करावा आणि या संकटाला परवण्यासाठी इतर  देशांसाठी नेतृत्त्व करावं  अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी कोरोना या जागतिक आरोग्य संकटाच्या थैमानाची माहिती देताना आता या गंभीर आजाराचं पुढील रूप भारतावर देखील अवलंबून आहे. चीनप्रमाणे भारताची लोकसंख्या देखील अधिक आहे. त्यामुळे भारतामध्ये आक्रमकतेने कोरोनाचा सामना केला जात आहे आणि भविष्यातही तो तसाच करावा लागेल असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी भारताने 'पोलिओ' आणि ' स्मॉल पॉक्स' सारख्या सायलंट किलर आजारांना हद्दपार करून आरोग्य क्षेत्रात मोठं योगदान दिले आहे. आता तशीच अपेक्षा 'कोरोना' आजाराबद्दल आहे. त्यामुळे भारतीयांना एकजुटीने आणि संयमाने करोना विरूद्धचा लढा लढणं गरजेचे आहे. Coronavirus उपचारासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारले पहिले स्वतंत्र रुग्णालयीन कक्ष; मास्क निर्मिती,अन्न पुरवठा सहित 'या' सुविधा सुद्धा केल्या सुरु.  

दरम्यान भारतामध्ये प्रामुख्याने परदेशी प्रवास करून आलेल्यांमध्ये आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या काही निकटवर्तीयांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे आता हा आजार समाजात पसरू नये म्हणून सरकार कडून अनावश्यक गर्दी टाळण्याचं कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक राज्यात जमावबंदीसह लॉकडाऊनचे आदेश आहेत. तर महाराष्ट्र, पंजाब मध्ये कर्फ्यू म्हणजे संचारबंदी लावण्यात आली आहे.

दिवसेंदिवस वाढता कोरोना व्हायरसचा धोका पाहता आता नागरिकांना शक्य तितके सोशल डिस्टंसिंग करणं आवश्यक आहे. कोरोना हे गंभीर संकट आहे आणि त्याचा सामना तितक्याच सक्षमतेने करणं ही आता काळाची गरज बनली आहे. जर इटली, फ्रांस या युरोपीयन देशांप्रमाणे कोरोना व्हायरस भारतामध्ये घुसला तर त्यानंतर देशात हाहाकार पसरू शकतो अशी भीती देखील अनेक मान्यवरांनी, जाणकारांनी व्यक्त केली आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 5500 च्या आसपास पोहचला आहे. तर स्पेन, फ्रांस, युके, अमेरिका येथे देखील कोरोना व्हायरसचं संकट गंभीर होत आहे.