Mukesh Ambani (Photo Credits: File Image)

देशातील कोरोना ग्रस्त रुग्णांची (Coronavirus Patients)  संख्या वाढत असताना अनेक ठिकाणी या रुग्णांवरील उपचारांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत, मात्र अशा वेळी अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची पंचाईत होते, तसेच या कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी विशेष सुविधा द्याव्या लागल्याने रुग्णालयांवर भार पडत आहे. अशावेळी स्वनिधीतून रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) तर्फे भारतातील पहिले कोरोना वरील उपचारासाठीचा खास रुग्णालयीन कक्ष उभारण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri)  येथे सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital)  ही सुविधा तयार निर्माण करण्यात आली असून यात 100 रुग्ण उपचार घेऊ शकतील. मागील काही दिवसांपासून रुग्णांचे वाढते आकडे पाहता हे पाऊल अंबानी (Ambani) कुटुंबाकडून उचलण्यात आले आहे. याशिवाय आर्थिक निधी व अन्य ही काही सुविधा रिलायन्सकडून पुढाकार घेऊन सुरु करण्यात आल्या आहेत. या सुविधा कोणत्या त्याचा हा मुद्देसूद आढावा..

- रिलायन्स इंडस्ट्रीजची सेवाभावी संस्था रिलायन्स फाउंडेशन च्या वतीने अवघ्या दोन आठवड्यात ही सोय निर्माण करण्यात आली आहे.

-लोधिवली येथील रुग्णालयात विलगीकरण सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

-रिलायन्स लाइफ सायन्सेसमध्ये कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे.

- राज्य सरकारला मुकेश अंबानी यांच्याकडून सहायता निधीत 5 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

-रिलायन्स फाऊंडेशन तर्फे या लॉक डाऊन कालावधीत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरविले जाणार आहे.

- कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

-रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्याचे सुद्धा योजले आहे.

-रिलायन्स समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जाणार आहे.

ANI ट्विट

दरम्यान, देशभरात कोरोना ग्रस्तांचा आकडा हा आता 471 वर पोहचला असून महाराष्ट्रात याचे सर्वाधिक म्हणजेच 97 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्यांना लॉक डाऊन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.