चीनच्या (China) वूहानमधून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग अल्पावधीतच जगभरात पोहोचला. मात्र पृथ्वीवर अजूनही काही ठिकाणे अशी होती जिथे या संसर्गाचा शिरकाव झाला नव्हता. यातीलच एक ठिकाण म्हणजे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट (Mount Everest). आता या शिखरापर्यंत कोरोना व्हायरस पोहोचला आहे. अलीकडे नॉर्वेचा गिर्यारोहक, आर्लेंड नेसमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. अशाप्रकारे जगातील सर्वात उंच शिखराच्या बेस कॅम्पमध्ये कोरोना संसर्गाची पहिली घटना आढळली आहे. त्यानंतर या रुग्णाला हेलिकॉप्टरने काठमांडूच्या रुग्णालयात नेण्यात आले.
आर्लेंड नेस या गिर्यारोहकाने शुक्रवारी माध्यम एजन्सीला माहिती देताना सांगितले की, 15 एप्रिल रोजी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर गुरुवारी आणखी एक चाचणी झाली, व ती नकारात्मक आली. सध्या तो नेपाळमधील स्थानिक कुटूंबियांसह राहत आहे. या प्रकरणात, ऑस्ट्रियाच्या गाईड लुकास फर्नबॅशने सांगितले की, या ठिकाणी तातडीने काही उपाययोजना न केल्यास बेस कॅम्पमध्ये उपस्थित हजारो गिर्यारोहक, मार्गदर्शक, सहाय्यकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो. इथल्या सर्वांची कोरोना विषाणू चाचणी केली पाहिजे. तसेच सर्वांना वेगवेगळे ठेवले पाहिजे.
काठमांडूच्या रुग्णालयाने एव्हरेस्टमधून आलेल्या एका रुग्णामध्ये कोरोना विषाणूची पुष्टी केली आहे. त्याचवेळी नेपाळच्या पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही गिर्यारोहकामध्ये कोविड-19 ची पुष्टी झाल्याची माहिती नाही. त्या म्हणाल्या, 'एका व्यक्तीला 15 एप्रिलला बाहेर काढण्यात आले होते, परंतु आम्हाला माहिती मिळाली की तो न्यूमोनियाने ग्रस्त आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: चिंताजनक! कोरोना विषाणूमुळे मांजरीचा मृत्यू; मानवांमधून प्राण्यात पसरत आहे व्हायरस)
दरम्यान, नेपाळने यावर्षी पर्वतारोहण करण्यासाठी 377 लोकांना परवानग्या जारी केल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, 2019 मध्ये जारी केलेल्या 381 परवान्यांच्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी वाढू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये एव्हरेस्टवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांची संख्या वाढली आहे, यामुळे इथे प्रचंड गर्दी जमते. यामुळेच अनेकांचे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. 2019 मध्ये इथे 11 लोक मरण पावले होते, त्यापैकी 4 लोकांचा मृत्यू गर्दीमुळे झाल्याचा मानले जात आहे.