कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने लोकांना संक्रमित करीत आहे. या साथीने केवळ मनुष्यच नाही तर प्राणीही मरण पावले आहेत. अशीच एक ताजी घटना ब्रिटनमध्ये समोर आली आहे. जिथे कोरोना संक्रमित झाल्यामुळे पाळीव मांजरीचा (Cat) मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, मांजरीच्या मालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर मांजरीलादेखील संसर्ग झाला होता. त्यानंतर तिचा मृत्यू झाला अशा प्रकारे मानवांमधून मांजरीला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याबाबत संशोधनाने पुष्टी केली आहे.
यानंतर स्कॉटलंडच्या (Scotland) ग्लासगो विद्यापीठाच्या (University of Glasgow) संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, कदाचित यापुढे पाळीव प्राण्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ब्रिटनमध्ये आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या मांजरीमध्येही हे संक्रमण आढळले होते. चार महिन्यांच्या या मांजरीला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने एप्रिल 2020 मध्ये उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले होते. त्यानंतर काही दिवसांत, मांजरीची प्रकृती अधिकच खराब झाली आणि तिचा मृत्यू झाला.
पोस्टमार्टम चाचण्यांमधून असे दिसून आले की, मांजरीला व्हायरल निमोनिया झाला होता ज्याने तिच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवले होते. तिच्या शरीरात कोरोना विषाणू असल्याचेही आढळले होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या मांजरीच्या मालकास यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता, परंतु त्याने आपल्या मांजरीची कोरोना चाचणी केली नव्हती. (हेही वाचा: बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द; वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतला महत्त्वपूर्ण निर्णय)
याबाबत बरीच तपासणी केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की कोरोना व्हायरस हा मालकाद्वारे त्याच्या पाळीव प्राण्यापर्यंत पोहोचला आहे. याआधी अमेरिका, हाँगकाँग आणि फ्रान्ससह जगभरात अनेक ठिकाणी मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र मांजरी किंवा इतर पाळीव प्राणी हा विषाणू मानवांमध्ये संक्रमित करु शकतात किंवा मानवांमध्ये हा रोग पसरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, याबाबत ठोस पुरावा समोर आला नाही.